दुबई :- गतविजेता भारत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असून आगामी आयसीसी २०१५ वनडे विश्वचषक भारतीय उपखंडात राहील, असा विश्वास विक्रमवीर सचिन तेंडुलकरने बुधवारी व्यक्त केला.
    आगामी वर्ल्डकपचे ‘काउंटडाउन’ सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या वर्ल्डकप १४ फेब्रुवारी २०१५ पासून सुरुवात होईल. त्यासाठी केवळ ५०० दिवस उरलेत. त्या निमित्ताने आयसीसीच्या संकेतस्थळावर सचिनने वरील प्रतिक्रिया दिली. जेतेपद राखून वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे लागोपाठ विजेता ठरणारा संघ बनेल, असे सचिनला वाटते.
   ‘‘भारतासह पाकिस्तान आणि श्रीलंका संघही मजबूत आहे. मात्र मी भारताला प्राधान्य देईन. भारतीय क्रिकेटपटूंची कामगिरी बहारदार व्हावी, असे मला वाटते. माझ्यासह देशातील सर्वच क्रिकेटचाहत्यांना त्यामुळे खूप आनंद होईल. त्यांनाही भारतीय क्रिकेटपटूंकडून सर्वोत्कृष्ट खेळ अपेक्षित आहे. आमचे अनेक क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियात खेळले असल्याने तेथील खेळपट्टया आणि तेथील वातावरणाबाबत त्यांना अनुभव आहे,’’असे सचिनने म्हटले.
    ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत न्यूझीलंडमधील वातावरणाशी जुळवून घेणे कठीण असते, असे सांगत सचिनने १९९२ वर्ल्डकपच्या डयुनेडिनमधील लढतीची आठवण सांगितली. अतिशय थंड वातावरणात खेळताना कस लागला, असे त्याने यावेळी सांगितले. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांच्यानंतर कारकीर्दीत सहा वनडे वर्ल्डकप खेळणारा सचिन जगातील केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. मायदेशात दोन वर्षापूर्वी झालेला वर्ल्डकप त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा वर्ल्डकप ठरला. २०१५ वर्ल्डकपमध्ये गतविजेता भारत ‘ब’ गटात असून सलामीला अॅडलेडमध्ये (१५ फेब्रुवारी) परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करेल. पाकिस्ताननंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आर्यलड, झिम्बाब्वे आणि पात्रता फेरीतून आलेल्या एका संघाशी झुंजेल.
        संयुक्त आयोजक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने आगामी वर्ल्डकपच्या ‘काउंटडाउन’चे जोरदार ‘सेलेब्रेशन’ केले. ऑकलंडमधील ताकापुना बीचवर मार्टिन गप्टिल, काइल मिल्स आणि मिचेल मॅकक्लेनॅघन या न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी लहान मुलांसोबत बीच क्रिकेटपटूंचा आनंद लुटला. सिडनीत झालेल्या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने ऐतिहासिक सिडनी हार्बर ब्रीजवर वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली.
 
Top