तुळजापूर : महिला कर्मचार्‍यास मानसिक त्रास देऊन तिच्या 10 महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून सैनिकी विद्यालयाच्या मुख्याध्यापकाविरुध्द तुळजापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
    वैजिनाथ घोडके (मुख्‍याध्‍यापक, सैनिक विद्यालय) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या मुख्‍याध्‍यापकाचे नाव आहे. यातील वैजिनाथ घोडके हे सैनिक विद्यालयातील लिपिक कल्पना महादेव रोचकरी यांना सतत त्रास देत होते. गरोदर असताना अवघड कामे सांगणे, कर्मचार्‍यांसमक्ष अपमान करून मानसिक त्रास देणे असे प्रकार केले. रोचकरी यांची 10 महिन्यांची मुलगी प्रणिती 31 ऑक्टोबर रोजी आजारी असल्याने त्यांनी रजेची मागणी केली, परंतु घोडके यांनी रजा मंजूर केली नाही. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी रोचकरी यांना रुजू करून घेतले नाही. याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली. याचदरम्यान मुलीचा आजार बळावल्याने तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस मुख्याध्यापक वैजिनाथ घोडकेच जबाबदार असल्याची तक्रार रोचकरी यांनी दिली. वेळीच मुलीवर उपचार झाले असते तर मुलगी वाचू शकली असती. मात्र रोचकरी यांना त्रास दिल्यामुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक घोडके यांच्याविरुध्‍द तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक शकुंतला सुरवसे करत आहेत.
 
Top