उस्मानाबाद :- सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना अर्थात प्रशासन जनतेच्या दारी हा उपक्रम ढोकी महसूल मंडळातील गावांसाठी सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी  येथे  राबविला जाणार आहे. तेथील जिल्हा परिषद शाळा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून जिल्हा व तालुका पातळीवरील विविध शासकीय यंत्रणांचा यात सहभाग राहणार आहे. संबंधित विभागाच्या लाभाच्या योजनांची माहिती याद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
      यासंदर्भात आज मंगळवार रोजी तहसिलदार सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली. यात विविध सहभागी विभाग आणि संबंधित ठिकाणी उपलब्ध करुन द्यावयाच्या सोईसुविधांबाबत चर्चा झाली.
     शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना थेट लाभ मिळावा, प्रशासनाविषयी असणारी नकारात्मक मानसिकता नाहिशी होऊन सकारात्मक दृष्टीकोनातून नागरिकांची कामे व्हावीत हा या समाधान योजना उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे
       या  उपक्रमात तहसील कार्यालयाशी संबंधित  तसेच, पंचायत समितीशी निगडीत  विविध योजनेची माहिती दिली जाणार आहे  शिक्षण, ग्रामिण पाणी पुरवठा आरोग्य विभाग, कृषि  आदींचे स्टॅाल्सही याठिकाणी राहणार आहेत.
        विविध योजनांचे लाभार्थीही आपली मनोगते यावेळी मांडणार आहेत. रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी,  अपंगांचे ओळखपत्र देणे व त्याचे नुतनीकरण, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, एस. टी. महामंडळामार्फत राबविण्या येणाऱ्या योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना आदींची माहिती तेथे मिळणार आहे. तसेच महिला बचतगटा मार्फत उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यात येणार आहे.
       ढोकी महसूल मंडळातील नागरिकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. काकडे यांनी केले आहे. 
      या पूर्वतयारी बैठकीस नायब तहसीलदार प्रभू जाधव, शिक्षण विभागाचे पी. एस. पारवे,  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ए. बी. चाटे, पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. एस. कळसाईत,  आरोग्य  विभागाचे ए. डी. जाधव, पशुसंवर्धन विभागाचे ए.ए. सोनवणे, तालुका कृषि विभागाचे बी. डी. काकडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-प्रतिनिधी  उपस्थित होते.
 
Top