पांगरी :- वृक्षतोड करून वनखात्याच्या जागेवर अतिक्रमण करणा-या व झाडे तोडणा-यांना मनाई करण्‍यास गेलेल्या कर्मचा-यांना शिवीगाळ, दमदाटी करून जिवे ठार मारण्‍याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना वालवड (ता. बार्शी) येथील वनखात्याच्या गट नंबर 44 मध्ये घडली. शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गौडमाळा (ता. वाशी, जि.उस्मानाबाद) येथील सात जणांविरूदध पांगरी पोलिसात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्‍यात आला असुन तीन महिलांना अटक करण्‍यात आली आहे.
    आप्पा सजन्या चव्‍हाण, सदाशिव चव्हाण, आत्माराम काळे, जांबुआप्पा चव्‍हाण, फुलाबाई आप्पा चव्हाण, मनिष सदाशिव चव्हाण व छाया भिवा चव्हाण अशी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत. वनखात्याचे कर्मचारी शशिकांत एकनाथ सावंत (रा. गौडगांव, ता.बार्शी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गौडमाळा (ता. वाशी) येथील कांही लोकांनी वालवड हदीमधील वनखात्याच्या जमीनीवरील वृक्ष तोड सुरू केली असता त्यांना तसे करू नका वृक्षतोड करू नका असे सांगितले असता आरोपींनी शासकीय कामात हस्तक्षेप करत जीवे ठार मारण्‍याची धमकी दिली. सावंत यांच्या फिर्यादिवरून सात जणांविरूद्ध शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top