उस्मानाबाद :- येथील जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास उद्योजक व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि बेरोजगार उमेदवारांनी चांगला प्रतिसाद दिला. औरंगाबाद, पुणे, बारामती, मुंबई अशा ठिकाणांहून आलेल्या उद्योजक प्रतिनिधींनी त्यांच्या आस्थापनेसाठी आवश्यक असलेल्या पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. एकूण 93 जणांची निवड या मेळाव्यातून करण्यात आली.
    बुधवारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी या रोजगार मेळाव्याचे उदघाटन केले. रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक रमेश पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  यावेळी कल्याणी फोर्ज (सणसवाडी, जि. पुणे), एएमपी ट्रेनिंग अकेडमी (इंद्रावणे, पुणे), पीयाजिओ  व्हेईकल (बारामती), लार्सन अन्ड टुब्रो (रायगड), धूत ट्रान्समिशन (औरंगाबाद) आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
    सुरुवातीला प्रत्येक उद्योग प्रतिनिधींनी त्यांच्या आस्थापनेबद्दल माहिती दिली.  तसेच उपस्थित  युवक-युवतींना संबंधित कामाचे स्वरुप समजावून सांगितले.
     प्रास्ताविकात पवार यांनी युवक-युवतींनी कोणताही न्यूनगंड न बाळगता व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी रोजगार मेळावा आयोजनामागील उद्देश विशद केला. आतापर्यंत घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांची माहितीही त्यांनी दिली.
     चव्हाण म्हणाले की, उद्योग क्षेत्रात स्पर्धा खूप आहे. अशावेळी संबंधित उद्योगाला लागणारे तंत्र कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. शिस्त व नियमांचे पालन करीत सकारात्मक मानसिकता  ठेवल्यास यश दूर नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या क्षेत्रात काम करीत आहोत, तेथील अद्यावत ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन कनिष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी महालिंग बळे यांनी केले. रोजगार मेळावा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. 
 
Top