उस्मानाबाद :- केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक विकास योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठीच आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी, टाकळी (ढोकी) आणि येवती येथे चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
      जिल्हा परिषद सदस्य सुधाकर गुंड गुरुजी, नारायण समुद्रे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सरडे, रोजगार हमी योजनेचे तालुकाध्यक्ष विनोद वीर, पत्रकार धनंजय रणदिवे, कल्पना मगर, अशोक शिंदे, बलभीम जाधव, सरपंच मंगल काटे, हरिश्चंद्र काटे, उपसरपंच सुधाकर एडके, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, नायब तहसीलदार प्रभू जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
       भंडारवाडी, येवती व टाकळी (ढोकी) येथे पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्य़ात आले.
   पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, गावच्या विकासाच्या आड कोणतेही मतभेद न आणता लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आपण स्वता जिल्ह्यासाठी पाठपुरावा करुन विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करुन आणला आहे.  या योजना गावांसाठी कशा राबविता येतील, हे पाहिले पाहिजे. प्रत्येक योजनेत आता लोकसहभाग महत्वाचा आहे. गाव व्यसनमुक्त, हागणदारीमुक्त झाले पाहिजे. यासाठी गावातील युवकांची मोठी जबाबदारी आहे. अन्न सुरक्षा कायदा, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे काम राज्य व केंद्र शासन करीत आहे. प्रत्येक गावातील युवकांनी या योजना समजावून घेऊन त्या गावात राबविल्या जातील हे पाहिले पाहिजे.
      भंडारवाडी येथे वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून तसेच विविध योजनातून जवळपास एक कोटीहून अधिक रकमेची विकासकामे केल्याचे त्यांनी सांगितले.  घरकुल योजना, रमाई आवास योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी  निगडीत योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी जाणीवपूर्वक पाठपुरावा केल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. श्री. सरडे व श्री. समुद्रे यांचेही यावेळी भाषण झाले.
      ज्याठिकाणी कामांचे भूमीपूजन झाले, ही कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले
 
Top