दयानंद बनसोडे
नळदुर्ग -: येथील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे न.प. सदस्‍य दयानंद आप्‍पाराव बनसोडे यांना सदस्‍यत्‍वावरुन अपात्र ठरवून त्‍यांचे न.प. सदस्‍यत्‍व रद्द करण्‍याची मागणी प्रकाश दिगंबर गायकवाड यांनी उस्‍मानाबाद जिल्‍हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्‍यावरुन याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी दखल घेऊन नळदुर्ग नगरपालिकेला तात्‍काळ अहवाल सदर करण्‍याचे आदेश दिल्‍याने न.प. वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.
     नळदुर्ग शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे न.प. सदस्‍य दयानंद बनसोडे हे असून  जिल्‍हाधिका-यांना दिलेल्‍या निवेदनात प्रकाश गायकवाड यांनी म्‍हटले आहे की, शहरातील हरिजन समाजासाठी महाराष्‍ट्र शासनाने समाजासाठी व सार्वजनिक हितासाठी नळदुर्ग शहरातील न.प. हद्दीतील जमीन सर्वे नं 236/1 क्षेत्र 8 हेक्‍टर 10 आर व सर्वे नं. 236/1/4 मधील चार हेक्‍टर पाच आर ही जमीन दिली आहे. सदरील जमीनीवर हरिजन समाज बांधवांचा कब्‍जा असून आजही सदरील जमीन ही शासनाच्‍या मालकीची आहे. या जमीनीवर शासनाची तहसिल व न. प. कार्यालयाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्‍या अतिक्रमण करून सदरील जमीनीवर न.प. सदस्‍य बनसोडे यांनी त्‍यांच्‍या स्‍वार्थासाठी पत्र्याचा शेड मारून लाभ घेत असल्‍याचा आरोप केला आहे. तसेच सदरील जागेवर कोणताही अधिकार नसताना पदाचा गैरवापर करून त्‍यांनी मेसर्स एक्‍सेल एम.पी. एनर्जी लि. या कंपनीला रक्‍कम घेऊन न.प ची कुठलीही परवागी न घेता बेकायदेशीररित्‍या टॉवर उभे करण्‍या‍करिता लाईन टा‍कण्‍यासाठी त्‍यांना मदत केली असल्‍याचे सांगून याबाबत आम्‍ही 3 सप्‍टेंबर रोजी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्‍यानंतर तहसिलदारांनी या पत्राची दाखल घेऊन मंडळाधिकारींना याबाबतचा अहवाल सादर करण्‍याचे आदेश दिले होते. त्‍यावरुन दि. 15 ऑक्‍टोबर रोजी मंडळ अधिका-यांनी सदरील जागेची स्‍थळ पाहणी करून संबधितांचे जबाब नोंदवून व पंचनामा करून दि. 17 ऑक्‍टाबर रोजी आपला अहवाल तहसिलदारांकडे सादर  केला. या अहवालावरुन  न.प. सदस्‍य बनसोडे दोषी असल्‍याचे स्‍पष्‍ट होत असल्‍याचे उल्‍लेख करुन सदरील अहवालावरून बनसोडे यांनी शासनाच्‍या जमीवर अतिक्रमण करून स्‍वताःच्‍या फायदयासाठी न.प. च्‍या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे पत्राचे शेड मारले आहे. त्‍यामुळे महाराष्‍ट्र नगरपालिका, नगरपंचायती आणि औद्योगीक नगरी अधिनियम 1965 नुसार बनसोडे हे अपात्र ठरतात. त्‍यामुळे त्‍यांचे न.प सदस्‍यत्‍व रद्द करणे आवश्‍यक असल्‍याचे गायकवाड यांनी म्‍हटले आहे.
          दरम्‍यान याप्रकरणी जिल्‍हाधिका-यानी सदरील मुद्याच्‍या अनुषंगाने वस्‍तुस्थितीबाबत स्‍वंयस्‍पष्‍ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्‍याचे न.प मुख्‍याधिका-यांना दिले आहेत. याप्रकरणी न. प सदस्‍य दयानंद बनसोडे यांच्‍याशी संपर्क साधाला असता, सदरील जमीन समाजाची असुन या घटनेशी आपला काही एक संबध नसल्‍याचे सांगुन कांहीनी आपला याप्रकरणात खोडसाळपणे नाव गोवले असुन आपल्‍यावरील आरोपाबाबत कायदेशीर उत्‍तर देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 
Top