मुंबई -: राज्यातील उदयोन्मुख खेळाडुंना त्यांचे क्रीडा कौशल्य व क्रीडा गुण विकसित करण्यासाठी वाव मिळावा तसेच खेळाडुंना अद्ययावत व्यायामशाळा, मैदाने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने क्रीडा विभागामार्फत विविध अनुदान योजना राबविल्या जातात. या योजनाचा लाभ नोंदणीकृत संस्थांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
    मुंबई शहराअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये तसेचज्या नोंदणीकृत मंडळाकडे स्वत:च्या मालकीची जागा आहे किंवा दीर्घ मुदतीच्या करारावर जागा उपलब्ध असल्यास अशा संस्थांना अद्ययावत खेळाची मैदाने उभारण्यास, मैदानाभोवती कुंपण घालण्यास किंवा अद्ययावत व्यायाम शाळा बांधण्यास किंवा व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी 2 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच राज्यातील युवक-युवतींना स्वत:चा व्यवसाय सुरु करता यावा तसेच बेरोजगार तरुण वर्गाला व्यवसायाचे ज्ञान प्राप्त व्हावे याकरिता मुंबई शहरातील युवक वर्गासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था तसेच धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणीकृत संस्थांना युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत व्यवसाय प्रशिक्षण शिबिराकरीता किंवा रोजगार प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याकरीता पंचवीस हजारापर्यंत अनुदान देण्यात येते.
    या योजनांचा लाभ नोंदणीकृत संस्था, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, नोंदणीकृत स्वायत्त संस्था, नोंदणीकृत मंडळे व व्यायामशाळा यांना घेता येईल.सदर योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर, मल्होत्रा हाऊस, तिसरा मजला, जी.पी.ओ.समोर, बोरीबंदर, मुंबई- 400 001, तसेच दुरध्वनी क्रमांक 022-22702373 किंवा भ्रमणध्वनी 9702861171, 9004139557 येथे संपर्क साधावा.
 
Top