उस्मानाबाद -: संपूर्ण भारतामधून या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून हा एक राष्ट्रीय कार्यक्रमा भाग आहे. पक्षकारांनी आपल्या बाजूवर तटून न राहता सरकारने आयोजित केलेल्या उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त पक्षकारांनी सामजस्याची भूमिका घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी केले.
    येथील जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन प्रसंगी श्री. तावडे बोलत होते.
    या कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी जी.टी.पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्टस्तर तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी.बी.मोरे, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एम.एस.पाटील, जिल्हा न्यायाधीश -1 चे एस.आय.पठाण, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ओ.आर.देशमुख, जिल्हा सरकारी वकील विजयकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, प्रत्येक न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची आकडेवारी वाढत आहे. ती कमी करण्यासाठी पक्षकारांना ही सुवर्णसंधी असून पक्षकारांनी तडजोडीने प्रकरणे मिटवून या योजनांचा लाभ घेऊन आपल्या कुटूंबाचा काळ सुखकर करावा,असे सांगितले.  विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी सांगितले की, जास्तीत प्रलंबित समेटांनी मिटविण्याचे पक्षकारांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.आय.पठाण यांनी केले तर आभार ओ.आर.देखमुख यांनी मानले.
 
Top