सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात पिक कर्ज पतपुरवठयाचा लक्षांक सर्वच बँकांनी पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे सहकार मंत्री ना. हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या.
    शासकीय विश्रामगृहात सहकार मंत्र्यांनी आज दि. 18 नोव्‍हेंबर रोजी पिक कर्ज पतपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. तसेच प्रत्येक बँकेकडून खरीप आणि रब्बी हंगामातील वाटप झालेल्या पिक कर्जाविषयी चर्चा केली.
    यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा उपनिबंधक बी.टी. लावंड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफीक नायकवाडी, नाबार्डचे श्री. काळे, अग्रणी बँकेचे श्री. कोरवार, डीसीसी बँकेचे मोटे यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     बैठकीत सूचना देताना सहकारमंत्री पुढे म्हणाले की, राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांनी कृषी पिक कर्ज वाटप वाढवावे. डीसीसी बँकेने कर्जाचा सर्वाधिक बोजा असणा-या थकबाकीदारांची यादी तयार करावी, वसुलीसाठी कालमर्यादीत धोरण आखुन थकबाकीदारांकडून वसुली करावी याचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेण्याचेही त्यांनी सांगितले.
    ज्या राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका पिक कर्जाचे उद्दीष्ट पूर्ण करणार नाहीत अशा बँकांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सूचीत केले. पिक कर्ज पतपुरवठ्याबाबत बँकांना काही अडचणी असल्यास त्यांनी तात्काळ कळवाव्यात. जिल्ह्यातील ऊस लागवड बघता सर्वच बँकांनी पिक कर्ज पतपुरवठ्याचा लक्षांक पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
 
Top