उस्मानाबाद :- नागरिकांच्या अपेक्षा शासनापर्यंत सकारात्मक पद्धतीने पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम प्रसारमाध्यमे करीत आहेत. त्यामुळे जनहितसेवेमध्ये माध्यमांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली असल्याचा सूर राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित चर्चेत उमटला. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद आणि  आकाशवाणी, उस्मानाबाद केंद्राच्या वतीने जनहितसेवेमध्ये माध्यमांची भूमिका या विषयावरील खास चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चर्चेदरम्यान ही भूमिका मांडली गेली.
         पत्रकार विशाल सोनटक्के, चंद्रसेन देशमुख आणि महेश पोतदार यांनी या चर्चेत सहभाग घेतला. सूत्रसंचलन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले. नि:पक्ष, जबाबदार पत्रकारितेचा गौरव म्हणून दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
           यावेळी माध्यमांच्या जागरुकतेविषयी संबंधितांनी आपली भूमिका मांडली. नागरिकांचे प्रश्न, अपेक्षा या प्रसारमाध्यमांतून व्यक्त होत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या या घटकामध्ये त्यांच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पडत असते, अशी नागरिकांची धारणा असते. त्या विश्वासाला प्रसारमाध्यमे पात्र ठरल्याचे सोनटक्के यांनी नमूद केले. इलेक्ट्रानिक माध्यमांमुळे एखादी घटना प्रशासन-शासन तसेच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे एखाद्या घटनेविषयी  तात्काळ उपाययोजना करण्याचे मार्ग प्रशासनाकडे उपलब्ध होतात. ही सकारात्मक पत्रकारिताच असल्याचे पोतदार यांनी नमूद केले तर देशमुख यांनी विविध सामाजिक घटकांमार्फत होणारी विविध उपक्रम, कार्यक्रम,आंदोलने आदींची माहिती प्रसारमाध्यमांतून जनतेपर्यंत जात असते. त्यावेळी महत्वाचा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतो, असे नमूद केले.
          सध्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. यातील मुद्रित व इलेक्ट्रानिक या माध्यमांची जनहितसेवेतील भूमिका वारंवार स्पष्ट झाली आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागांपर्यंतच्य़ा विविध विषयांचे तसेच समाजघटकांतील व्यक्त-अव्यक्त विषयांचे चित्रण यात होत असते. एखाद्या ठिकाणची नकारात्मक बाजू समोर आणून शासन-प्रशासनाने त्याविषयी सकारात्मक कार्यवाही करणे ही माध्यमांची जनहिताचीच भूमिका असल्याचे यावेळी श्री. सोनटक्के, देशमुख आणि पोतदार यांनी नमूद केले. सोशल मीडियामध्ये अद्यापपर्यंत स्वनियंत्रकाची भूमिका नसल्याने या माध्यमांच्या आगामी काळातील वापराविषयी सावधानता बाळगण्याची भूमिका या चर्चेदरम्यान मांडण्यात आली.
            माध्यमांचे स्वरुप बदलले असले तरी स्वातंत्र्यपूर्वकाळात आणि स्वातंत्र्यानंतरही त्याचा उपयोग विधायकतेसाठी करण्यात आल्याची अनेक उदाहरणे असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. 
 
Top