बार्शी : चिखर्डे (ता. बार्शी) येथील विद्युत विभागाच्या सबस्टेशनला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवार रोजी टाळे ठोकून निदर्शने केली.
     बुधवारी दि.२० नोव्‍हेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास बार्शी तालुक्‍यातील चिखर्डे, आगलावे, बावी, तांदूळवाडी, कळंबवाडी, येळंब आदी गावच्या परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व गावकर्‍यांनी वीज पुरवठ्यातील अनियमितता तसेच मनमानीपणे कनेक्शन तोडण्यास सुरुवात केल्याने सदरचा टाळे लावण्याचा कार्यक्रम केला. मागील अनेक दिवसांपासून येथील शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिलदारांना तसेच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांत निवेदने दिली आहेत. यावेळी वीज वितरण कंपनीचे तालुका सहाय्यक अभियंता यांनी निवेदन घेतले. त्यांच्यावतीने यापुढे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल व वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबविण्यात येईल, असे आश्वासनही दिले.
    सदरची वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम व वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार यापुढेही सुरु राहिल्यास यापुढे रास्ता रोको व योग्य त्या वेळेनुसार इतरही कडक आंदोलने करण्यात येतील असे शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी यावेळी म्हटले.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top