कळंब : शेत रस्‍त्‍याच्‍या हद्दी खुणा करण्याचे काम महसुली नियमानुसार प्रशासकीय पातळीवरून चालू असताना काही शेतकर्‍यांनी अडथळा आणल्‍याने शेतक-यांच्‍या दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत चौघेजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना कळंब तालुक्‍यातील मस्सा (खं.) येथे बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. जखमींना पुढील अंबेजोगाई येथील रुग्‍णालयात उपाचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे.
     कळंब तालुक्यातील मस्सा खं. येथील सर्वे नं.  ६0२, ६९६, ६९८ शेतकर्‍यांमध्ये शेतात जाण्या येण्यासाठी वापरात येणार्‍या बांधावरून  रस्ता द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी महसूल विभागाकडे केली होती. जवळपास २0 शेतकर्‍यांनी यासंदर्भात केलेल्या मागणीनुसार तहसीलदार कळंब यांनी  संबंधित शेतकरी यांना २0११ मध्ये रस्ता दिला होता.
        परंतु काही शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे अपील केले असता त्यांनीही तहसीलदार यांचा आदेश कायम ठेवला होता. त्यावरून शेतकर्‍यांच्या मागणीनुसार १८ नोव्हेंबरला या रस्त्याची हद्द निश्‍चित करण्यासाठी मंडळ अधिकारी, भूमापक व पोलिसाना तहसीलदार यांनी आदेश दिले होते.
        बुधवार दि. २० रोजी दुपारी मंडळ अधिकारी पंढरी श्रीपती औटे, भुमापक एम. आर. सूर्यवंशी, एम. एस.मगर, तलाठी एन. डी. नागटिळक व चार पोलिस कर्मचारी संबंधित ठिकाणी जाऊन नकाशाप्रमाणे हद्द कायम करण्यासाठी खुणा करत असताना  यास  विरोध असणार्‍या कांही शेतकर्‍यांनी अडथळा आनायला सुरुवात केली. यावेळी शेतकर्‍यांच्या दोन गटात वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले.
         यामध्ये रामराजे शेखू नकाते यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असून, त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. इतर तीन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी  मंडळ अधिकारी पंढरी श्रीपती औटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,गैरकायद्याची मंडळी जमा करून दमदाटी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे यासंदर्भात सुग्रीव कुंडलिक फरताडे, कुंडलिक परसु फरताडे, राहुल नामदेव फरताडे, अतूल सुग्रीव फरताडे, मथुरा कुंडलिक फरताडे, कुसुम नामदेव फरताडे (सर्वजण रा. मस्सा खं) यांच्यावर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एम.एन.शेळके हे करीत आहेत.
 
Top