नळदुर्ग :- येथील सय्यद अब्‍दुला शहा मेमोरियल ऊर्दू शाळेत अनाधिकृतपणे शालेय पोषण आहाराचा 83 क्विंटल 50 किलो तांदुळ व अन्‍य साहित्‍य सापडले होते. या घटनेला दोन महिन्‍यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, या प्रकरणात केवळ मुख्‍याध्‍यापकावर निलंबनाची थातुरमातुर कारवाई झाली. परंतु खरे गुन्‍हेगार संस्‍थाचालक असल्‍याचे आरोप करुन त्‍यांच्‍यावर फौजदारी गुन्‍हा दाखल करुन विद्यार्थ्‍यांना न्‍याय द्यावा, अन्‍यथा याप्रकरणी महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्‍यावतीने दि. 2 डिसेंबर रोजी गाढव मोर्चा काढण्‍याचा इशारा तुळजापूर गटशिक्षाणाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
      नळदुर्ग येथील सय्यद अब्‍दुला शहा मेमोरियल ऊर्दू शाळेतील शालेय पोषण आहार गैरप्रकार हे चव्‍हाट्यावर आल्‍यावर विद्यार्थी व पालकांतून संताप व्‍यक्‍त करण्‍यात आला. ही घटना सप्‍टेंबर महिन्‍यामध्‍ये घडली. हा प्रकार गंभीर असून गरीब विद्यार्थ्‍यांच्‍या तोंडचा घास पळविणारे दुसरेच असून याप्रकरणी पडद्या मागच्‍या सुत्रधारांचा शोध घेऊन कडक कारवाई होणे गरजेचे आहे. चौकशीच्‍या पडद्याआड सदर प्रकरण दडपण्‍याचा प्रशासनाकडून प्रयत्‍न केला जात असल्‍याचे नमूद करुन सदर प्रकरणी संस्‍थाचालकावरती तात्‍काळ फौजदारी स्‍वरुपाचा गुन्‍हा दाखल करुन गोरगरिब सर्वसामान्‍य विद्यार्थ्‍यांना न्‍याय द्यावा, अन्‍यथा याप्रकरणी महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्‍यावतीने दि. 2 डिसेंबर रोजी गाढव मोर्चा काढून आंदोलन करण्‍याचा इशारा तुळजापूर पंचायत समितीच्‍या गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्‍यात आला आहे. या निवेदनावर महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उस्‍मानाबाद जिल्‍हा चिटणीस प्रमोद परमेश्‍वर, धर्मराज सावंत, सुरज कोठावळे, समर्थ पैलवान, तुषार पेंदे आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
 
Top