उस्मानाबाद :- केवळ औरंगाबाद विभागच नव्हे तर अगदी धुळे, जळगाव, रायगड, सांगली आदी जिल्ह्यातील महिला बचत गटांनी घेतलेला सहभाग.. पारंपारिक वस्तू निर्मितीच नव्हे तर आधुनिक परंपरेला साजेशा वस्तुंची विक्रीसाठी असलेली रेलचेल..पोटपूजेपासून वेशभूषेसाठी आवश्यक असणा-या पदार्थ अन वस्तुंची उपलब्धता यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांनी आयोजित केलेले स्वयंसहायता समुह व बचतगट निर्मित वस्तुंचे प्रदर्शन  वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलाच्या भव्य पटांगणावर भरलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी उस्मानाबादकरांनी गर्दी केल्याचे चित्र दुस-याच दिवशी पाहायला मिळाले. उस्मानाबादकरांचा हा सहभाग येत्या 1 डिसेंबरपर्यंत मिळेल, असा आशावाद या प्रदर्शनासाठी आलेल्या बचत गटांच्या महिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
      राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती विभाग, स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद आणि येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने या स्वयंसहायता समुह व बचत गट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. जवळपास अडीचशे बचत गटांचा सहभाग हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
मराठवाड्याचे वैविध्य आणि वैशिष्ट्य दाखवणारे विविध पदार्थ याठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय, त्या-त्या भागातील प्रसिद्ध असणाऱ्या वस्तूही बचत गटांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून आलेल्या  बचत गटांच्या महिलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आल्याने त्यांच्याही चेहऱ्यावर समाधानाची भावना आहे. स्वकष्टातून निर्मित वस्तूंची, कलाकुसरीची ग्राहकांद्वारे दाद मिळावी अशीच त्यांची अपेक्षा आहे.
       बसस्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात हे प्रदर्शन भरविण्यात आल्याने इतर तालुक्यातून तसेच ग्रामीण भागातून प्रदर्शन पाहायला येणाऱ्या नागरिकांचीही सोय होणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवसात प्रदर्शन पाहायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढणार असेच चित्र दिसत आहे.
       प्रदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच बचत गटाच्या सदस्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक डॉ. केशव सांगळे  आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत. 
 
Top