उस्मानाबाद :– जिल्हा पाणी व  स्वच्छता मिशन कक्षातील निर्मल भारत अभियान व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी व जिल्हयातील महाविदयालयीन युवकांना पाणी व स्वच्छता  या विषयामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी दिनांक 28 व 29 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरीय व दिनांक 13 डिसेंबर 2013  रोजी जिल्हास्तरीय स्व्च्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन  करण्यात आल्याची  माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
    महाविदयालयीन युवकांमध्ये पाणीपुरवठा, पाणी गुणवत्ता  व स्वच्छता  या बाबींची जागृती करणे, प्रत्येक महाविदयालयातुन संदेश वाहक व अभ्यासु वक्ते तयार करुन जनजागृती करणे या उद्देशाने राज्याच्या  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतामित्र  वक्तृत्व करंडक  स्पर्धेचे आयोजन करण्यात  आले आहे. यावर्षी ही स्पर्धा  दिनांक 28 नोव्हेंबर रोजी उमरगा,लोहारा, कळंब व वाशी व दिनांक 29 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद, तुळजापुर, भुम, व परंडा याप्रमाणे होणार आहे.
      या स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविदयालयीन गटासाठी 1) विचार निर्मल महाराष्ट्राचा -प्रवास आव्हानांचा 2) जोश तरुणाईचा ,जागर स्वच्छतेचा 3) शुध्द पाणी पिण्याचे, आरोग्य  सांभाळी गावाचे 4) माझ्या स्वप्नातील  स्वच्छ -निर्मल गाव. 5) आपलं पाणी-आपली  योजना हे विषय असतील. तर, वरिष्ठ महाविदयालयीन गटासाठी- 1) राखु पाण्याची गुणवत्ता, मिळेल आरोग्याची सुबत्ता. 2) लोकसहभाग गावाचा-आधार पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा 3) तरुणाईच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती. 4) मी निर्मल गावचा ग्रामसेवक बोलतोय. 5) स्वच्छतेतून समृध्दीकडे   हे विषय  आहेत. या तालुकास्तरीय स्पर्धेतील  दोन्ही गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
      तालुकास्तरीय दोन्ही गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविदयालयीन गटासाठी 1. स्वछ निर्मल शाळा- बालकास लावी लळा, 2. शुद्ध थेंब पाण्याचा लाभ आरोग्यदायी जीवनाचा, 3. कचरा नव्हे कांचन-घनकचऱ्याचे व्यवस्थापन, 4. मिळून साऱ्याजणी मिळवू स्वच्छ व शुद्ध पाणी, 5.  साठवू थेंब थेंब पाण्याचा, विचार रुजवु पाऊस संकलनाच.  वरिष्ठ  गटासाठी  1. माझ्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर निर्मल व समृ्द्ध महाराष्ट्र, 2. करु सांडपाण्याचे व्यवस्थापन, धरतीचे होईल नंदनवन, 3. करु तपासणी पाण्याची, हमी  आरोग्यदायी जीवनाची, 4. बहु असोत सुंदर, स्वच्छ महादेश हा…
        या जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक 13 डिसेंबर रोजी होणार आहेत. या जिल्हास्तरीय सपर्धेतील दोन्ही  गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 11 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.
     स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तालुकास्तरावर संबधित पंचायत समितीतील गट संसाधन केंद्र,  पाणी व स्वच्छता व जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेतील  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामध्ये संपर्क साधून सदरच्या स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन युवकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  जिल्हा समन्वयक तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी केले आहे.
 
Top