काही माणसांचे स्वभावच असे असतात की “मला माझं भलं करायला जमंना आणि दुस-याचं भलं झालेलं माझ्याच्यानं बघवंना” कुणाचे काही चांगले झाले की काही संबंध नसताना मत्सरापोटी आपला जळफळाट करुन  घेणा-या अनेक व्यक्ती तुम्हाआम्हालाही भेटतात. पण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या आपल्याच सख्ख्या भावाचा भरला संसार बघून मत्सराने पेटून उठणा-या आणि आपल्या मत्सराच्या आगीत भावाच्या संसाराची राखरांगोळी करणा-या एका हैवानाने अमानुषपणे मांडलेल्या रक्ततांडवाची ही कथा...
      सांगली जिल्हयाच्या तासगाव तालुक्यातील एका खेडेगावात 1985 साली घडलेली ही घटना आहे. या गावलगत असलेल्या डोंगर कपारीला लागून भटक्या समाजाची सात-आठ घरांची वस्ती होती. याच वस्तीत शंकर आणि गुणवंत (नावे बदलली आहेत) हे दोघे भाऊ आपापल्या बायका-मुलांसह राहत होते. गुणवंत थोरला तर शंकर लहान. दोघांचाही मेंढया आणि गुरेपालनाचा व्यवसाय होता. शंकर आणि त्याची बायको इंदुमती हे दोघेही कष्टाळू. रात्रंदिवस काबाडकष्ट करुन पैशाला पैसा जोडून त्यांनी मोठया नेटाने आपला संसार चालवला होता. कष्टाचे फळ हे नेहमीच मिळतेच मिळते,त्यामूळे हळूहळू शंकरच्या संसारात बरकत येत गेली. शंकर आणि इंदुमतीच्या संसार वेलीवर दोन सुंदर कळयाही फुलल्या होत्या. एकूनच दृष्ट लागावी असा त्यांचा संसार चालला होता. शंकरच्या नेमक्या उलट असा गुणवंताचा स्वभाव गुणवंतपेक्षा “अगुणवंत” हेच नाव त्याला चपखल शोधून दिसले असते. चंगीभंगी आणि मुलखाचा बोंबलभिका. त्यामूळे त्याचा संसारही कसातरी रडत खडत सुरु होता. मीठ आहे तर मिरची नाही आणि मिरची आहे तर तेल नाही, अशी रोजचीच बोंबाबोंब त्यालाही दोन मुलं होती. आपल्याला संसाराची ही अशी परवड सुरु असताना आपल्या लहान भावाचा संसार मात्र नेटानं सुरु असल्याचं बघून गुणवंताचा नुसता जळफळाट व्हायचा त्याला आपल्या भावाचा भरल्या संसाराचा हेवा वाटायचा. त्यामूळे कशा पध्दतीने आपल्या भावाचा भरल्या संसाराला चूड लावता येईल याचाच तो रात्रंदिवस विचार करायचा. “सख्खा भाऊ” अशा पध्दतीन कुणी कुणाचा बांध रेटलेला नसताना मनोमन त्याचा “पक्का वैरी” झाला होता. मात्रवरुण तो तसेच दाखवत नव्हता. त्यामूळे शंकर आणि त्याच्या बायकोलाही गुणवंताच्या मनातील विखारांचा थांगपत्ता नव्हता. शंकर गुणवंताला आपला मोठा भाऊ इंदुमती आपला थोला दिर आणि मुले काका म्हणून मान देत होती. पण गुणवंताचा मनात मत्सराचा हैवान नुसते थैमान घालत होता. एके दिवशी शंकर हा काही कामानिमित्त्‍बाहेरगावी गेला होता, सायंकाळ झाली तरी तो परतला नव्हता. इंदुमतीची सात वर्षांची मूलगी गुरे चारायला गेली होती, तर इंदुबाई आपल्या तीन महीन्याच्या तान्हया मूलीला कुशीत घेऊन दुध पाजत चुलीपूढे बसली होती. अधिच विरळ असलेल्या त्या वस्तीवर त्यावेळी लोकांचीही फारशी वर्दळ नव्हती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमार असावा आणि शंकराच्या भरल्या संसारावर गुणवंतच्या रुपाने काळ घिरटया घालू लागला. त्याच्यातील सख्खा भाऊ पक्का वैरी बसून जागा झाला नूसता जागाच झाला नाही तर त्याने हैवानाचे रुप धारन केले. मत्सराने पेटलेल्या या हैवानाने मागच्या पुढचा कसलाही विचार न करता आपल्या घरातील कु-हाड घेतली आणि चोरपावलाने शंकराच्या घरी जावून पाठमो-या बसलेल्या इंदुमतीच्या मानेवर जीव खावून कु-हाडीचा घाव घातला त्या धावदार तलवारीच्या एकाच घावात इंदुमतीची मान गळयापर्यंत तुटुन बसल्या जागीच खाली लोंबू लागली. काही क्षणापूर्वी आपल्या मातेच्या आधारातील अमृतपान करण-या इंदुमतीच्या त्या चिमूरडीच्या मूखातही आपल्या मातेचे रक्त्‍ठिबकू लागले. दुध समजून तेच ती चाटु लागली. आपण जिच्या कुशीत आहोत, त्या मातेवर काळाने झडप घातल्याचे बिचा-या त्या चिमुकल्या निष्पाप जीवाच्या गावीही नव्हते.
    इंदुमतीचा मुडदा पाडून हैवान झालेला गुणवंत रक्ताने माखलेली कु-हाड घेऊन बाहेर आला. तोच इंदुमतीची गुरे चारायला गेलेली सात वर्षाची मुलगी समोरुन आली. तिने घरात डोकावले तर आई रक्ताच्या थारोळयात पडली होती. लहान बहीण त्याच रक्ताच्या थोराळयात लोळून टाहो फोडत होती ते दृश्य बघून त्या लहानग्या जीवाचा थरकाप उडाला आणि ती थरथर कापू लागली. इतके अमानवी आणि अघोरी कृत्य करुनही गुणवंतरुपी हैवान शांत झाला नव्हता. इंदुमतीच्या पोरीने हे सारे बघितले आहे, त्यामूळे हिला जिवंत सोडली तर आपली खैर नाही, असा विचार करूण तीच कु-हाड घेऊन तो या निष्पाप मुलीच्या अंगावर धावून गेला. अधिच घाबरूण गेलेला तो कोवळा जीव काका मला मारू नका मी तुमच्या पाया पडते असे म्हणून त्याच्या पायावर लोळूण घेऊ लागला. पण त्या बिचारीला काय ठाऊक की हा आपला काका नसून साक्षात आहे? त्या कोवळया जीवाचा आकांत आणि विनवण्या ऐकूण साक्षात कळकळीच्या हदयालाही पाझर फुटला असता, पण परमेश्वराने या हैवानाला काळीज नावाचा अवयवच दिला नसावा. त्याने कु-हाडीच्या एकाच घावात त्या कोवळया जीवाचे मुंडके एखादे फुल खुडावे तसे धडावेगळे केले. गुणवंतचे हे क्रुरकर्म बघून कदाचीत कळीकाळाचाही थरकाप उघडला असावा.
      गुणवंतरुपी हा हैवान इतका निर्दयी बनला होता की एवढे रक्ततांडव करूनही त्याच्या चेह-यावर पश्चाताप अथवा भीतीचा लवलेश नव्हता. जसे काहीच घडलेच नाही अशा त-हेने घरी बायका पोरात जाऊन जेवून खावून निवांत झएोपी गेला. इकडे आपल्याच जन्मदात्रीच्या रक्ताच्या थारोळयात लोळणा-या त्या तीन महिन्यांच्या मुलीचा सतत ऐकू  येणार टाहो ऐकून हळूहळू काही लोक शंकराच्या घराजवळ आले. समोरचे दृष्य बघून जमलेले लोक हादरले हळूहळू गावभर बातमी पासरली आणि सारा गाव शंकरच्या घराच्या दिशेने धावू लागला. रात्री उशिरा शंकरही घराकडे परतला आणि आपल्या भरल्या-नांदत्या संसाराचे झालेलेहे रक्ताशिंपण बघून भान हरपून जाग्यावर कोसळला. एवढे सारे होवूनही गुणवंत मात्र आपल्या घराचे दार लावून निवांत झोपला होता. एखादया नरभक्षक लांडग्याने अनेकांच्या नरडीचा घोट घेवून निवांत झोपावे, तसा हा नरपशू झोपला होता.
           घटनेचे गांभीर्य ओळखून त्या गावाचे पोलीस पाटील विष्णूपंत यांनी तातडीने बारा वाजण्याच्या सुमारास तासगाव पोलीस ठाणे गाठले आणि झाल्या घटनेची वर्दी दिली. त्यावेळी व्ही.एस. जाधव हे तासगाव पोलीस ठाण्याचे इनचार्ज होते. त्यांनी तातडीने हवालदार गिरजाप्पा गडदे, अशोक हिरूगडे, भीमराव मोरे, श्रीकांत महाडिक यांना सोबत घेऊन घटना घडलेले गाव गाठले. घटना स्थळाचे अत्यंत थरारक आणि तितकेच हदयद्रावक दृश्य बघून पोलिस पथकही हादरले, यांच्याही हदयाला पाझर फुटला. चौकाशी करता पोलीसांना समजले की शंकरला एक मोठा भाऊ असून घटनास्थळी सारा गाव लोटला असताना गावात असूनही तो मात्र अजून आलेला नाही. इथेच पोलिसांचा संशय बळावला.
        त्यांनी तडक गुणवंतचे घर गाठले तर गडी निवांत घोरत पडलेला होता. पोलिसांनी त्याला विचारले गावात काय झाले आहे. ते माहीत आहे का? त्यावर साळसूदपणाचा आव आणून तो म्हणाला आजी मला कसलं काय ठावं असणार आमची गाय आज येली (व्यायली) म्हन म्या  सकाळपासस्नं त्याच उसाबरीत हाय पोलीसांनी गुणवंताच्या घराची झडती घेतली असता रक्ताचे डाग असलेली एक बंडी (बनियान) चुलीतील राखेत खुपसुन ठेवलेली दिसली. बंडीवर हे कसले रक्ताचे डाग आहेत असे विचारता ते गाईच्या रक्ताचे डाग असल्याचे त्याने सांगितले. पण पोलिसांचा त्याच्यावर विश्वास नव्हता. त्यांनी सगळया घराची झडती घेतली आणि त्यांना एका कोप-यात लपवून ठेवलेली रक्ताने माखलेली कु-हाड सापडली. त्यावर मात्र गुणवंताची बोलती बंद झाली. पोलिसांनी काढण्या घालून त्याला पोलिस गाडीत घातले. घटनास्थळाचा रितार पंचनामा केला आणि मृतदेह शवचिकीत्सेसाठी पाठवून पोलिस ठाणे गाठले. गुणवंताचे क्रूरकर्म बघून पोलिसांच्याही टाळक्याची शीर तडकली होती. ठण्यात आल्या आल्या प्रत्येकांनी रागाने त्याच्यावर आपला हात साफ करूण घेतला.
केवळ भावाचा सुखी संसार बघवत नव्हता म्हणून त्याच्या बायकोचा आणि मुलीचा खून केल्याची गुणवंतने कबुली दली. बंडीवरील आणि कु-हाडीवरील रक्ताचे डाग इंदुमती आणि तिच्या मुलीचे असून कु-हाडीवरील हाताचे ठसे हे गुणवंताचेच असल्याचा प्रयोगशाळेतून रिपोर्ट आला. गुणवंतवर दुहेरी खुनाचा खटला दाखल करण्यात आला. परिस्थितीजन्य व पोलिसांनी सादर केलेले पुरावे, काहीजणांची साक्ष याच्या आधारे न्यायालयाने गुणवंतला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
    आयुष्यभर गुणवंतला आपला संसार धड करता आला नाही. पण केवळ हेवा आणि मत्सरापोटी त्याने आपल्याच लहान भावाच्या भरल्या संसाराला मूठमाती दिली, दोन निष्पाप जीवाचे बळी घेतले. शेवटी न्यायालयाच्या निवाडयाने आधीच धड चालत नसलेला त्याचा स्वत:चा संसारही मोडून पडला. मत्सर-द्वेष माणसाला आयुष्यातून कसे उठवतो, त्याचे हे एक उदाहरण आहे.
-  सुनील कदम      
 
Top