सर्वत्र आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना उमरगा तालुक्‍यात मात्र निराशाजनक वातावरण आहे. कुठलाच पक्षाकडून फारसा गाजावाजा करण्‍यात येत नसल्‍याने ''तीच बाटली अन् तीच दारु'' अशी अवस्‍था आहे. तालुक्‍यात दोन प्रमुख आणि प्रतिस्‍पर्धी पक्ष आहेत. मात्र हे दोन्‍ही पक्ष व्‍यक्‍ती सापेक्ष असल्‍यामुळे कार्यकर्त्‍यांत दिवाळीतही शिमगा दिसत आहे.
    उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघातील प्रमुख पक्षात मोठ्याप्रमाणात गटबाजीला ऊत आला असून नेते मात्र गटबाजी दिसू देत नाहीत. त्‍याचा परिणाम निष्‍ठावान व पक्षासाठी वाहून घेतलेल्‍या कार्यकर्त्‍यांवर होत आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली असतानादेखील नेतेमंडळीची लगीनघाई दिसून येत नाही. लोकसभा मतदार संघात तगडे पैलवान उतरणार असल्‍याने आखाडा चांगलाच पेटणार आहे. त्‍यामुळे ''गड'' कोण ''सर'' करणार? याची उत्‍सुकता राहणार आहे.
    उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्‍यावतीने उमेदवारी मलाच भेटली पाहिजे, म्‍हणून पक्षनिरीक्षकांसमोर     सभा, बैठका घेतल्‍या जात आहेत. शिवसेनेच्‍यावतीने बार्शी येथील आरएसएम उद्योग समूहाचे राजेंद्र मिरगणे, परंडा तालुक्‍यातील भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन प्रा. तानाजी सावंत, मागील पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवार राहिलेले माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख प्रा. रविंद्र गायकवाड यांच्‍यात मोठी स्‍पर्धा सुरु असून भाजपाच्‍यावतीने माजी खासदार सुभाष देशमुख यांच्‍या नावाची सर्वत्र चर्चा आहे. मात्र ऐनवेळी कोणाची लॉटरी लागणार, हे तर येणार काळच सांगेल.
    मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेकडे प्रा. रविंद्र गायकवाड यांच्‍याशिवाय तगडा उमेदवार नव्‍हता. त्‍यामुळे सेनेने गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. ज्‍या अपेक्षेने उमेदवारी दिली होती, त्‍याच्‍या कित्‍येक पटीने जास्‍त शिवसैनिकांनी गायकवाड पर्यायाने सेनेला साथ दिली. प्रा. गायकवाड यांना बार्शी तालुक्‍याने साथ न दिल्‍याने पराभवास सामोरे जावे लागले होते. पण यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे. मुळचे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील पण सद्यस्थितीतील बार्शी येथील आरएसएम उद्योग समूहाचे राजेंद्र मिरगणे यांच्‍यासारखा तगडा उमदेवार शिवसेनेकडे लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्‍हणून शिवसेना प्रमुखांकडे मागणी केली असून उमेदवारी आपणालाच मिळणार, या उद्देशाने त्‍यांनी लोकसभा मतदार संघात गत सहा महिन्‍यांपासून दौ-यांना, कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. मिरगणे यांच्‍याप्रमाणेच तानाजी सावंत यांनीही भूम, परंडा, वाशी, उस्‍मानाबाद, कळंब, बार्शी आदी विधानसभा मतदार संघात आपल्‍या प्रचाराची मोहिम सुरु केली असल्‍याचे दिसत आहे. सावंत यांनीही उमेदवारीची मागणी करीत बाळासाहेबांच्‍या प्रथम पुण्‍यस्‍मरण दिनादिवशी हजारो समर्थकांसह मुंबईत हजेरी लावली होती. उमरग्‍याचे माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख प्रा. रविंद्र गायकवाड यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. सर्वत्र सभा, बैठका घेण्‍याचा सपाटा सुरु आहे, तेही प्रचारात मागे नसल्‍याचे दिसते.
    यावेळेस शिवसेनेकडे तगडे उमेदवार असल्‍याने कोणास उमेदवारी द्यावी, असा प्रश्‍न पक्षश्रेष्‍ठींसमोर पडल्‍याशिवाय राहणार नाही. परंतु पक्षनिरीक्षकांना सर्वच उमेदवारांनी गटबाजी दिसू दिली नाही. पक्षनिरीक्षकांनीही मिरगणे, सावंत व गायकवाड यांना एकत्र एकाच व्‍यासपीठावर आणण्‍याची किमया करु शकले नाहीत. काहीही असो मागच्‍या वेळेस ज्‍याप्रमाणे सेना उमदेवारांला पराभव स्विकारला लागला, त्‍याप्रमाणे यावेळेस होणार नाही, याची दक्षता पक्षश्रेष्‍ठी घेतल्‍याशिवाय राहणार नाही. यातच भाजपाच्‍यावतीने माजी खासदार सुभाष देशमुख यांच्‍या नावाची जोरदार चर्चा आहे.
    कॉंग्रेस पक्षाच्‍यावतीने कॉंग्रेस ज्‍येष्‍ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, आ. बसवराज पाटील यांच्‍या नावाचा बोलबाला असला तरी चाकूरकरांची उमेदवारी कर्नाटक राज्‍यातील बिदर लोकसभा मतदार संघातून जाहीर झाल्‍यासारखीच असल्‍याची चर्चा आहे. आ. बसवराज पाटील यांना त्‍यांचा औसा विधानसभा मतदार संघ सांभाळणे अवघड झाले आहे. लोहारा येथील लोकमंगल साखर कारखान्‍याने पंधरा दिवसातच ऊसाच्‍या माध्‍यमातून होणारे लोकसभा, विधानसभा, जिल्‍हापरिषदा, पंचायत समितीतील राजकारण बाजूला सारल्‍याचे गावागावांत स्‍पष्‍ट जाणवत आहे. यावेळेस राष्‍ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी स्‍वतः होऊन उमदेवारी नाकारल्‍यास एसटी महामंडळाचे अध्‍यक्ष जीवनराव गोरे यांच्‍यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे.

- लक्ष्‍मण पवार 
उमरगा  
 
Top