बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सद्यस्थितीत उद्योगांच्या सुरु असलेल्या स्पर्धेमुळे बार्शीत अनेक मोठे प्रकल्प सुरु होतील. त्यामुळे होणार्‍या विकासामुळे ज्याप्रमाणे पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते, त्या म्हणीप्रमाणे बार्शी तेथे सर्व क्षेत्रात सरसी अशी म्हण तयार होईल असे मत अँड. ह. भ. प. जयवंत बोधले महाराज यांनी व्यक्त केले. पाडव्याच्या मुहर्तावर सुरुवात झालेल्या भाग्यलक्ष्‍मी मिनरल वॉटर यांच्या सोनूरिच ऍक्वा मिनरल वॉटर प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अशोक गायकवाड, माजी आमदार राजेंद्र राऊत, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड्.सुभाष जाधवर, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, जिल्हापरिषदेचे विरोधी पक्षनेते संजय पाटील, अँड. अनिल पाटील, दिलीप खटोड, माजी नगरसेवक रावसाहेब मनगिरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक सावळे, कॉंग्रेसचे नगरसेवक विजय नाना राऊत, उद्योजक राजेंद्र मिरगणे, अँड्.करंजकर, अभिजीत, संजय, रणवीर, रणजीत राऊत, राजाभाऊ काकडे आदीजण उपस्थित होते.
    पुढे बोलतांना बोधले महाराज म्‍हणाले, चाणक्याच्या नीतीप्रमाणे नेहमी उद्योगात राहिलेल्या मनुष्याला कधीही दारिद्रय प्राप्त होत नाही. भगवंताचे नाम सतत घेतल्यास पापच उरणार नाही, गप्प बसल्यावर भांडणे होणारच नाही, आत्‍मस्वरुपी ज्ञान झाल्यावर मृत्यूचे भयच राहणार नाही. शुध्दता आणि पवित्रता यावरुन पाण्याचे चार प्रकार होतात. त्यामध्ये पहिला पवित्र नाही शुध्द नाही म्हणजे दारुसारखे द्रवपदार्थ, दुसरा पवित्र आहे पण शुध्द नाही नदीतील पाणी, तिसरा शुध्द आहे पण पवित्र नाही मिनरल वॉटर, चौथा पवित्रही आहे, शुध्दही आहे.
    प्रास्ताविकात बोलतांना राजेंद्र राऊत म्‍हणाले, पाच वर्षापूर्वी याच माळरानावर प्रकाशजी बोधले महाराज यांच्या हस्ते सुरुवात झालेल्या लक्ष्‍मी दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योग आज सुस्थितीत आहे. मागील दहा दिवसांत परवाना मिळाल्यानंतर कमी वेळात पाडव्याचा मुहूर्त साधला, अलिकडे उद्योगाची स्पर्धा सुरु झाली आहे, एक एक नवीन उद्योग सुरु होतांना आनंद होत आहे. एक दोन महिन्यात खासगी मार्केट कमिटीचे काम पूर्ण होईल, भविष्यात चांगले हॉस्पिटल, शासकीय एम.आय.डि.सी. मध्ये मोठे उद्योग उभे राहतील.
 
Top