नळदुर्ग -: इटकळ (ता. तुळजापूर) येथील आधार सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने मराठी रंगभूमी दिनाचे औचित्‍य साधुन नळदुर्ग येथील 'आपलं घर' प्रकल्‍पामध्‍ये मंगळवार रोजी लोक कलावंतांचा गौरव व दयानंद काळुंके लिखित 'पानगळ' या चारोळी पुस्‍तकाचे प्रकाशन सोहळा मोठया थाटाने संपन्‍न झाले.
    नळदुर्ग येथील आपलं घर येथे संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोग निर्मिती संस्‍थेचे रमाकांत कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून प्राईड इंडियाचे संस्‍थापक रमेश जोशी, जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे संचालक, अँड दिपक आलुरे, आपलं घरचे व्‍यवस्‍थापक शिवाजी पोतदार आदि उपस्थित होते. ज्येष्‍ठ कवी योगिराज माने बोलताना म्‍हणाले की, माणसातील माणूसकी आणि गांवचं गांवपण हे आजच्‍या स्थितीतही टिकून राहणे गरजेचे आहे. स्‍वतःच्‍या दुःखाच्‍या वेदना सहन करीत रसीक प्रेक्षकांचा सतत हसवत ठेऊन मानवी मनाच्‍या संवेदना जागी करुन समाजप्रबोधनाचं व मनोरंजनाचं विधायक कार्य आपल्‍या अभिजात कलेतून कलावंत करत असतो म्‍हणून समाजाच्‍या सांस्‍कृतिक वैभवात मोठी भर पडते, असेही ते शवेटी म्‍हणाले.    
    प्रारंभी 'नटराज' च्‍या मूर्तीचे पूजन करुन दिपप्रज्‍वलनांनी या कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. यावेळी नाट़य, संगीत, नकला, शाहीरी, पोवाडे, भारुड, अभंग, लावणी, पथनाटय, वादक अशा कला प्रकारात आपला वेगळा ठसा उमटविलेल्‍या कलावंताचा सन्‍मानपत्र, शाल, फेटा, साडी व पुष्‍पगुच्‍छ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. यामध्‍ये मुमताज बेगम शेख, भारती अंधारे, गौतम माळाळे, मृगेंद्रसिंग धारवाडकर, चंद्रकांत कदम, अंबादास कनट्टी, महादेव कसबे, आनंदा पांचाळ, निलेश वाघमारे, कोंडीबा बनसोडे, श्रीराम पोतदार, खंडू मुळे, बंटी देडे, विनायक भूमकर, शाहीदाबी सय्यद, मसाजी दवळे, प्रदिप पाटील, प्रबोध कांबळे, ज्‍योतीबा येडगे, आनंद साखरे आदींसह 25 कलावंतांना गौरविण्‍यात आले.
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक दयानंद काळुंके यांनी तर सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. आर.एस. गायकवाड यांनी आभार मानले.
 
Top