बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन व पुणे येथील गॅलक्सी कौन्सीलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीतील शिवशक्ती अर्बन को ऑप. बँकेस बँको २०१३ हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ.प्रकाश बुरगुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    बुधवारी दि.४ डिसेंबर रोजी साज रिसॉर्ट महाबळेश्वर येथे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून दि. ३ ते ५ दरम्यान राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीरदेखिल घेण्यात येत आहे. यावेळी पी.एन.जोशी यांचे बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणा या विषयावर, डॉ. मेधा दुभाषी यांचे मायक्रोफायनान्सिंग या विषयावर, प्रशांत पोळ यांचे भविष्यकालीन बँकींगमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व या विषयावर, विश्राम दिक्षीत यांचे आपला ग्राहक ओळखा अँटी मनी लॉंड्रींग या विषयावर, के.सी.मिश्रा यांचे रिझर्व बँकेच्या चर्चा लेखान सहकारी बँकिंगचे भवितव्य या विषयावर, व्ही.एस.पत्की यांचे बँकींगसाठी विमा गरज या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.
    कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या विचाराने वाटचाल करणार्‍या शिवशक्ती बँकेतून सभासद, ठेवीदरांच्या हिताचे तसेच समाजोपयोगी कार्यास अग्रेसर राहून सातत्याने काम केले जाते. कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमामुळेच एन.पी.ए. चे प्रमाण ३% वर आले व संस्थेस ऑडीट वर्ग अ चा दर्जा प्राप्त झाला आहे. सभासदांकरिता १५% लाभांश, कर्मचार्‍यांना १००% वेतनवाढ, बँकेने मागील स्वमालकीची जागा घेतली असून त्याचे बांधकामही प्रगतीपथावर आहे. बार्शीतील मोक्षधामच्या जीर्णोध्दारास देणगी, दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्‍मान, कर्जदारांचा सत्कार आदी उपक्रमांतून सामाजिक बांधीलकी जोपासण्यात येते. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला घेण्यात येत आहे यामुळेच बँकेस आदर्श संस्था २०१२ हा जिल्हास्तरीय पुरस्कारदेखिल यापूर्वीच मिळाला आहे. त्याच पध्दतीची वाटचाल यापुढेही सुरु असल्याममुळे यंदाचा बँको २०१३ हा पुरस्कार प्राप्त झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. प्रा.अशोक जगदाळे, व्यवस्थापक भारत उमाटे व संचालक यावेळी उपस्थित होते.
 
Top