बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शासकीय आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना ना नफा ना तोटा तत्वावर हमी भाव मिळावा, या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यात बार्शी बाजार समिती व राज्य मार्केटींग फेडरेशनच्या वतीने मका खरेदी केंद्राची सुरवात करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती कुंडलीक गायकवाड यांनी दिली.
    राज्‍य मार्केटींग फेडरेशन व बार्शी बाजार समितीच्‍या संयुक्‍तपणे शेतक-यांच्‍या धान्‍याला हमी दर मिळावा, या उद्देशाने राज्‍याचे पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री दिलीप सोपल यांच्‍या सूचनेनुसार शनिवार दि. 9 नोव्‍हेंबर रोजी बार्शी येथील बाजार समितीच्‍या सेल हॉलमध्‍ये मका खरेदीचा शुभारंभ करण्‍यात आला. यावेळी फेडरेशनचे जिल्‍हा प्रतिनिधी शिवाजी सावकर, बाजार समितीचे ज्‍येष्‍ठ संचालक तानाजी मांगडे, महादेव करडे, मल्‍लीनाथ गाढवे, सचिव किसन ओव्‍हाळ, मर्चन्‍ट असोसिएशनचे किशोर शहा, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
    शासकीय आधारभूत धान्‍य खरेदी योजनेंतर्गत बाजार समितीच्‍यावतीने प्रतिक्विंटल 1310 रुपये दराने शेतक-यांचा मका खरेदी करण्‍यात येत आहे. यापूर्वी फेडरेशनच्‍यावतीने बार्शी बाजार समितीने उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केले आहे. सध्‍या मक्‍याचे बाजारात दर पडल्‍याने शेतक-यांना हमी भाव मिळावा, या उद्देशाने यांच्‍या सूचनेने हे केंद्र सुरु केल्‍याचे यावेळी फेडरेशनचे प्रतिनिधी सावकर यांनी सांगितले. बाजार समितीने आजअखेर सुमारे 250 क्विंटल 4300 रुपये प्रतिक्विंटल दराने उडीद खरेदी केला आहे. त्‍यामुळे शेतक-यांना फायदा झाला आहे.
    बाजारात दर कमी असलेल्‍या धान व भरड धान्‍याची खरेदी करण्‍याची शासकीय योजना शेतक-यांसाठी असून त्‍याचा फायदा शेतकरी वर्गाने घ्‍यावे, तसेच भविष्‍यात ज्‍वारीचे दर बाजारात कमी झाल्‍यास ज्‍वारी खरेदी केंद्रही सुरु करण्‍यात येईल, असे सचिव ओहाळ यांनी सांगितले.
 
Top