कळंब (बालाजी जाधव) : वाशिम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करणा-या ज्ञानयोग विद्यालय कोथळाच्या १४ वर्षीय मुलींच्या संघाने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत निर्विवादपणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित महाराष्ट्र राज्य शालेय कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
      सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघावर आपल्या धडाकेबाज कामगिरीचा धसका बसवत ज्ञानयोग विद्यालय कोथळाच्या मुलींच्या १४ वर्षीय संघाने अत्यंत चांगला खेळ दाखविला सुरुवातीला मुंबई संघावर २० गुणांनी दणदणीत विजय मिळविला त्यानंतर सेमी फायनल सामन्यात अमरावती विभागीय संघाचा मोठा फरकाने धुव्वा उडवत ३२ गुणांनी पराभव करत अंतिम सामन्याकडे आगेकुच केली. अंतीम सामन्याचे गांभिर्य ओळखून प्रतिस्पर्धी पुणे संघाला कडवी झुंज देत ५ गुणांनी सामना जिंकला आणि अजिंक्यपद पटकावले. या संघाचे नेतृत्व कर्णधार शितल ओव्हाळ हिने केले तर सहभागी खेळाडूमध्ये गंगासागर शिंदे, तेजस्विनी राऊत, शितल मेघराज शिंदे, प्रतिक्षा पाटील, भाग्यश्री डोंगरे, लक्ष्मी भिसे, पुजा आंबिरकर, शुभांगी मोदी, निशा सिरसट यांचा समावेश होता.
   या स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणारी कु. गंगासागर उत्तम शिंदे हिला महाराष्ट्र कब्बडी संघाची कर्णधार म्हणून देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली आहे तर कु. पूनम ओव्हाळ सतरा वर्षीय व कु. वैशाली ओव्हाळ हिची चौदा वर्षीय मुलीच्या महाराष्ट्र राज्य कब्बडी संघात निवड झाली आहे. 
या यशस्वी संघाला क्रिडा शिक्षक धर्मराज विरगट, अनिल शिंदे, ज्ञानोबा शिंदे, राजाभाऊ शिंदे, लक्ष्मण मोहिते, साजेद चाऊस, कांबळे यांनी मार्गदर्शन केले.   या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रामहरी शिंदे, संस्थेचे सचिव चत्रभुज टेळे, पोपटराव आडसुळ, मुख्याध्यापक फुलचंद कदम, बबनराव लोकरे, आदिंनी केले आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातुन उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव राज्याच्या पटलावर आणल्यामुळे विजयी संघाचे क्रिडाप्रेमींनी कौतुक केले आहे.
 
Top