उस्मानाबाद -: ढोकी (ता. उस्‍मानाबाद) येथील पेट्रोलपंपानजिक जीपमधून सात लाख २७ हजार ९७0 रुपये असलेली बॅग लंपास झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. यामध्ये ऑईल व्यापार्‍याच्या मुनिम व चालकानेच गुन्हा केल्याचे समोर आले असून २४ तासाच्या आत गुन्ह्याची उकल करुन मुद्देमालासह त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
     उस्मानाबाद येथील ऑईलचे व्यापारी संतोष सूर्यकांत शहा यांचा मुनिम सय्यद आयुब सय्यद अकील व चालक समाधान बबन बनसोडे हे ऑईलचा पुरवठा करण्यासाठी जीप (एम. एच. २५/२१३८) लातूरला गेले होते. परतत असताना त्यांच्याजवळ वसूलीचे ७लाख २७ हजार ९७0 रुपये होते. ढोकी येथे पेट्रोलपंपानजिक रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर बॅग जीपमध्ये ठेवून खाली उतरले असता, समोरच्या सीटवरुन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद सय्यद अकील याने दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सचिन पाटील, कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस. आर. ढवरे, स्थागुशाचे पोनि माधवराव गुंडीेले यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, सदर दोघांकडे घटनेबाबत चौकशी करत असताना संशय आल्याने पोलिसांनी सय्यद आयुब सय्यद अकील याच्या उस्मानाबाद शहरातील दर्गाह रोडवरील घराची झडती घेण्यात आली. तेव्हा सदर रक्कम असलेली बॅग त्याच्या घरात पोलिसांना मिळून आली. घटना घडून २४ तास पूर्ण होण्याआधीच गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, सदर दोघांना संगनमत करुन चोरीचा गुन्हा केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली असून त्यांना अधिक तपासासाठी ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
Top