उस्मानाबाद :- मोटार वाहन अपघातास परिणामकारक आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना शासन स्तरावर केल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासासाठी ३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. 
      रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती, मालमोटारचालक व इतर वाहनचालकांमध्ये रस्ता नियम पाळण्याबाबतचे महत्व पटवून देण्यासाठी या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. रस्ता सुरक्षा नियम जागृतीसाठी बनविलेला रथ जिल्हाभर फिरवला जाणार आहे. याशिवाय, कार्यशाळा, भित्तीपत्रके, बॅनर्स आणि प्रसारमाध्यमांतून या विषयाची जनजागृती केली जाणार आहे. तसेच १२ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षाविषयी जागृतीसाठी  ‘वॅाकेथॅान’चे आयोजन करण्यात आले आहे.
       जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॅा. के. एम. नागरगोजे यांनी  या रस्ता सुरक्षा अभियान पंधरवाडा नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅा. वैशाली कडूकर, जिल्हा रुग्णालयाचे डॅा. तानाजी माने, वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राऊत यांच्यासह नगपालिका, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, एस.टी. महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
      यावर्षीचे रस्ता सुरक्षा अभियानाचे घोषवाक्य हे ‘When on road, always say Pehle Aap’ हे आहे. रस्ता सुरक्षा अभियान कालावधीत चौक सभा घेऊन मोटार वाहन कायदयाची माहिती करुन देणे, वाहनचालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना तसेच बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावणे, मोटार वाहन परवान्याविषयी जनजागृती करणे, शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 
       शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षेसंदर्भात निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. मोटार वाहन नियमांची नागरिकांना कितपत माहिती आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने एक स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.
     अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी दुरुस्ती, साईनबोर्ड व माहितीदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुभाजक रंगवणे, वाहतुक साधनांची दुरुस्ती, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
      तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर मोठे तपासणी नाके, बाजार आगारे आदी ठिकाणी वाहनचालकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. मालवाहतूकदार संघटना व असोसिएशन  यांच्या सहकार्याने वाहनचालकांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहे. एस.टी. बस स्टेशन, आगार, बसथांबे आदी ठिकाणी रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात येणार आहेत. रस्ता सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे आणि उप प्रादेशिक अधिकारी म्हेत्रेवार यांनी केले आहे.    
 
Top