कळंब (बालाजी जाधव) :- खरीप हंगाम 2012-13 चे हेक्‍टरी तीन हजार रुपये मंजूर झालेले अनुदान अद्यापपर्यंत कळंब तालुक्‍यातील पंचवीस टक्‍के शेतक-यांना जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेने निधी अभावी दिलेले नाही. सदर रक्‍कम आठ दिवसांच्‍या आत संबंधी शेतक-यांना नाही दिल्‍यास सोमवार दि. 6 जानेवारी 2014 रोजी रास्‍ता रोको करण्‍याचा इशारा शिवसेनेने कळंब तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
    खरीप अनुदान हे राष्‍ट्रीयकृत बँकामधून वाटप करण्‍याची मागणी यापूर्वीच शिवसेनेने केली होती. मात्र स्‍थानिक नेत्‍यांच्‍या दबावामुळे अनुदान डीसीसी बँकेमधून वाटप करण्‍याचे ठरले. सदर रक्‍कम कोणत्‍याही कर्जात कपात करुन न घेता त्‍याचे तात्‍काळ वाटप करण्‍यात येईल, असे प्रतिज्ञापत्र बँकेने प्रशासनाला दिले. परंतु दोन महिन्‍यापेक्षा जास्‍त कालावधी उलटूनही कळंब तालुक्‍यातील शेत-यांना डीसीसी बँकेत चक-या मारावे लागत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून हे रक्‍कम नेमकी कोणाच्‍या घशात आहे, याची चौकशी करण्‍याची मागणी करुन येत्‍या आठ दिवसाच्‍या आत अनुदानाची रक्‍कम संबंधित शेतक-यांना देण्‍यात यावी, अन्‍यथा दि. 6 जानेवारी रोजी रास्‍ता रोको करण्‍याच्‍या इशारा कळंब तालुका शिवसेनेच्‍यावतीने देण्‍यात आला आहे. या निवेदनावर उपनगराध्‍यक्ष पांडुरंग कुंभार, शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख रामलिंग आवाड, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, भैय्या बावीकर, बळवंत तांबारे, गजानन चोंदे, हर्षद अंबुरे, विश्‍वनाथ तांदळे, संजय मडके, हरिभाऊ शिंदे रामहरी मुंडे आदींच्‍या सह्या आहेत.
 
Top