सोलापूर :- गाणगापूर येथे सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
सोमवारी सकाळी 7 ते 12 यावेळेत दर्शनपुजा झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता पाळण्याचा उत्सव साजरा होणार आहे. तसेच मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महाराजांच्या निर्गुण पादुकांचा रथोत्सव मंदिरापासून मारुती देवालयापर्यंत काढण्यात येणार आहे. या कालावधीत दर्शनासाठी येणा-या भाविकांना मंदिर समितीतर्फे अन्नदान सेवा सुरु करण्यात आली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून जवळपास 50 हजारांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येणे अपेक्षित आहे. यात्री निवासात भक्तांच्या राहण्याची सोय आहे. भीमा-उरजमा संगमामध्ये भरपूर पाणी असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.