नागपूर -: लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष अधिक सक्षम असायला हवा तरच सत्ताधा-यांवर अंकुश ठेवता येतो. त्यामुळे लोकहिताची कामे होतात, असे प्रतिपादन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवार रोजी नागपूर येथे केले.
      राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे विधानमंडळात आयोजित ‘संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान’ या विषयावर तावडे बोलत होते. यावेळी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत पाटील, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी उपस्थित होते.
     यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तावडे म्हणाले की, सध्या माध्यमांमुळे विरोधी पक्ष आहे की नाही असे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका काय आहे, असा प्रश्न पडल्यास नवल नाही. परंतु हेही लक्षात ठेवले पाहिजे की, विरोधी पक्षामुळेच भ्रष्टाचार, घोटाळे यासारख्या अनेक गोष्टी जनतेसमोर उघड झाल्या आहेत. त्यातच लोकांचा सध्याच्या राजकीय व्यवस्थेवरचा अविश्वास अनेक कारणांनी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची भूमिका प्रखरपणे मांडणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. तावडे पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांमध्ये संवेदनशीलता कमी असेल तर विरोधी पक्षांना आक्रमक व्हावे लागते. अनेकदा सत्ताधारी लोकहिताच्या अनेक योजना किंवा विधेयके सादर करत असतात. मात्र, त्या योजना किंवा विधेयकांमध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी सभागृहात विरोधकांना आक्रमक व्हावे लागते.  मात्र, चांगल्या, लोकहिताच्या कामांसाठी सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष पाठिंबाही देतात.
      सभागृहात विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतात, परंतु बाहेर आल्यावर ते एकत्र दिसतात, या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर श्री. तावडे म्हणाले की, सध्याची राजकीय संस्कृती ही बदलत आहे. पूर्वी विरोध म्हणजे सर्वच प्रकारचा विरोध असा होता. परंतु आता व्यक्तिगत विरोध न करता फक्त सभागृहात वैचारिक विरोध केला जातो. यात काही वावगे नाही. पुरोगामी महाराष्ट्रात आता बदल होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
     आपली लोकशाही व्यवस्था खूपच चांगली आहे. मात्र, आज अनेक दूरचित्रवाहिन्या राजकारणाचे वेगळे चित्र मांडतात. त्यांच्या सततच्या नकारात्मक प्रसारणामुळे आजची तरुणपिढी राजकारणाचा तिटकारा करताना दिसत आहे. असे सांगून श्री. तावडे यांनी आता मात्र, वाहिन्यांवर जे दिसते ते सर्वच खरे नसते. त्यामुळे जर तरुण पिढी या व्यवस्थेत सहभागी झाली तर त्यांना या व्यवस्थेचे महत्त्व कळेल व लोकहिताची कामे होतील, असा विश्वास व्यक्त केला.
     प्रारंभी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत पाटील यांनी तावडे यांचा परिचय करून दिला व त्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी केले. पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचा विद्यार्थी विजय फासाटे याने आभार मानले. 
 
Top