नागपूर - लोकांचे हित पाहून कायदे करण्यासाठी शासन संवेदनशील असावे. तसेच हे कायदे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्याची गतिमानता प्रशासनात असली पाहिजे. त्यातूनच लोकशाही बळकट होईल, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी केले.
    राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे विधानमंडळातील विधान परिषदेत आयोजित ‘संवेदनशील शासन आणि गतिमान प्रशासन’ या विषयावर उपाध्यक्ष  पुरके बोलत होते. यावेळी विधानसभा सदस्य वामनराव कासावार, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी उपस्थित होते.
      प्रा. पुरके म्हणाले की, महाराष्ट्रातील संतांनी संवेदनशीलतेचे विचार मांडतानाच मानवतेचाही विचार करण्याची शिकवणूक दिली. सभागृहात लोकांचे प्रश्न मांडताना ते शेवटच्या क्षणापर्यंत सोडविण्याची संवेदनशीलता लोकप्रतिनिधींमध्ये असेल तरच त्रुटी नसलेले चांगले कायदे लोकांसाठी केले जातात. कारण लोकप्रतिनिधी हा शासनातील निर्णय घेणारा घटक असतो. शासनाने केलेले कायदे राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करून ते लोकांच्या हितासाठी योग्य रितीने राबविण्यासाठी प्रशासनही गतिमान असणे लोकशाहीत आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या कामामध्ये व्यावसायिकता असणे आवश्यक आहे.
     प्रशासनाने लोकशाहीत लोक हेच सत्तेचा उद्‌गम व केंद्र बिंदू मानूनच काम करावे. संवेदनशील शासन आणि गतिमान प्रशासनातूनच लोकशाही खंबीर होते आणि त्यातूनच सर्वसामान्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची त्या प्रकारची मानसिकता व बेधडकपणाही हवा. संवेदनशील शासनाबरोबरच जनताही संवेदनशील असावी, असेही प्रा. पुरके म्हणाले.
     विधानसभा सदस्य  कासावार यांनी पुरके यांचा परिचय करून दिला आणि स्वागत केले. सूत्रसंचालन विधीमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी तर शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्राची विद्यार्थीनी अश्विनी गायकवाड हिने आभार मानले.
 
Top