नळदुर्ग -: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून भारतीय संविधानाची निर्मिती केलेली असून संविधानाने संबंध मानवजातीला त्यांचे मानवी हक्क मिळवून दिलेले आहेत. म्हणून भारतीय संविधान हा आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून संविधानाचा अभ्यास करून मानवी हक्क मिळविणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष एस.के.गायकवाड यांनी चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे केले.
     नळदुर्ग व परिसरातील विविध सामाजिक संस्था संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून संविधान समर्थन मंचच्या माध्यमातून दि. 26 नोहेंबर महात्मा फुले स्मृती दिनापासून ते 6 डिसेंबर  डॉ. बाबासाहेब अंबेडकर महापरिवर्तन दिनापर्यंत भारतीय संविधान प्रबोधन सप्ताह रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीची सुरूवात मौजे वागदरी (ता. तुळजापूर) येथून सुरूवात झाली असून या निमित्ताने चिकुंद्रा येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात एस. के. गायकवाड हे बोलत होते.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक, संघर्ष समितीचे पी.एस. पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रचनात्मक संघर्ष समितीचे मुकेश सोनकांबळे, आधार सामाजिक संस्‍थेचे दयानंद काळुंके हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  महादेव गरड यंनी तर भैरवनाथ कानडे यांनी केले. तर आभार सत्यवान गायकवाड यांनी मानले. यावेळी सहशिक्षक वामन चव्हाण, बळीराम जेठे, शाळेचे संस्थापक यशवंत गायकवाड यांच्‍यासहसह विद्यार्थी, पालक  उपस्थित होते.
 
Top