बार्शी  (मल्लिकार्जून धारुरकर) : मूकबधिरांसाठी काम करणार्‍या संस्थेने मागे वळून न पाहता आता पुढील वाटचालीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. कर्णबधिर मुलांच्या खडतर प्रवासामध्ये जगण्याचे साधन मिळण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण गरजेचे आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे आहोत, असे मत पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
    इंडियन रेडक्रॉस संस्थांतर्गत बधिर मूक विद्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या कर्णबधिर राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या ५३ वधू-वरांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदविला.  यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, नगराध्यक्ष कादर तांबोळी, संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय कश्यपी, अध्यक्ष विनय संघवी, हिरेमठ हॉस्पिटलचे समन्वयक अरुण दिवटे, उपाध्‍यक्ष अजित कुंकूलोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलतांना ना. दिलीप सोपल म्हणाले, महाराष्ट्रात अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न होत असून अशा मुलांच्याबाबत चांगल्या प्रकारचे आयोजन केले असल्याचे सांगत विवाह सोहळ्यासाठी सर्वतोपरी मदत करु असे आश्वासन दिले. आजकाल आईवडिलांनाही चांगल्या शारिरीक क्षमतेच्या मुला-मुलींना सांभाळणे अवघड व अशक्य होत चालले आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या संस्थेतून चांगल्या प्रकारचा सांभाळ केला जात आहे. मुलांबद्दल कणव, आत्मियता असलेल्या अनेक व्यक्तींकडून अशा उपक्रमांना केंव्हाही मदतीचा हात पुढे येईल. मुलांना देवाघरची मुले समजून सांभाळ करणारे शिक्षक चांगले आहेत. मुलींच्याबाबत विशेष लक्ष द्यावे व कसल्याही प्रकारची अडचण अथवा त्रास त्यांच्या भावी आयुष्यात न होण्यासाठी प्रयत्न करावे.
    यावेळी सुरु असलेल्या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत माहिती सांगणारे दुभाषी शिक्षक रोहन भालेराव यांनी सर्वांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक अजित कुंकूलोळ यांनी केले, सूत्र संचलन दिवाणजी यांनी केले तर आभार काका सामनगावकर यांनी मानले.
 
Top