उस्मानाबाद :- महावितरणच्या अधिका-यांनी थकबाकी तसेच वीज बिल भरलेल्या शेतकरी व इतर ग्राहकांची  वीज तोडू नये. या प्रकारची कारवाई केल्यास जनक्षोभाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, असे आदेश पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आज सोमवार रोजी महावितरणच्या अधिका-यांना दिले.
    पालकमंत्री चव्हाण यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आज महावितरणचे अधिक्षक अभियंता पापडकर यांच्यासह विविध अधिका-यांची यासंदर्भात बैठक घेऊन जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. वारंवार सूचना देऊनही यासंदर्भात कार्यवाही होत नसल्यास जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत पालकमंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिका-यांना फटकारले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, विश्वास शिंदे, परंडा न.प.चे उपनगराध्यक्ष श्री. सिद्दीवाल, ब्रिजलाल मोदाणी, नारायण समुद्रे, भाऊसाहेब उंबरे, युवराज नळे यांच्यासह  विविध पदाधिकारी-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
    पालकमंत्री चव्हाण यांनी महावितरणला सरसकट कोणतेही डीपी बंद केले जाऊ नयेत, असे आदेश दिले. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करुनही त्यांची कामे न करणे, वीजबिल भरमसाठ आल्याच्या तक्रारी, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी, नवीन डीपी नादुरुस्त होणे व त्यानंतर तेथे दुसरा डीपी न बसविणे, वीज कर्मचारी जागेवर नसणे अशा तक्रारी जिल्ह्याच्या विविध भागातून येत असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. यावर तात्काळ उपाययोजना करा, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
      दुधगावकर यांनी उस्मानाबाद तालुक्यातील बेडकी नाला, खानापूर, चोराखळी, अंबेहोळ आदी तलावांतून असणा-या शेतक-यांचा वीजपुरवठा शासनाने तोडला होता. मात्र तरीही या शेतक-यांना वीजबिल आकारली गेली असल्याच्या मुद्दा मांडला. जिल्ह्यात इतर ठिकाणीही हीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यास सुचविले होते. मात्र, महावितरण याबाबत गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले.
ढोकी, तेर, वाघोली येथेही हीच परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
        जादा बील आकारणीबाबत मेळावे घेऊन नागरिकांची वीजबिले दुरुस्त करुन घ्या, असे यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
 
Top