बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील कला, क्रिडा, सांस्कृतिक, साहित्य, नाट्य, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यासाठी मागील ११ वर्षांपासून कै. बाबुरावजी डिसले स्‍मृती जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा कै. बाबूरावजी डिसले जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मंडळाचे आधारस्तंभ शिवाजीराव डिसलेशेठ यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ जानेवारीला करण्यात येत असल्याची माहिती आयोजक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कापसे, सचिव प्रताप दराडे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे.
         स्‍मृतीचिन्ह, सन्‍मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शिवाजीराव डिसलेशेठ यांच्या प्रेरणेने दि. १२ जुलै १९९९ रोजी मंडळाची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून आजतागायत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंतांचा मंडळाच्यावतीने गौरव करण्यात येत आहे. तसेच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेऊन मंडळाने राज्यातील नाट्य चळवळीत तसेच बार्शीच्या इतिहासातील मानाचे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या सन २०१३-१४ च्या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील वर नमूद केलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनी आपल्या केलेल्या कार्याचा सविस्तर माहिती असलेला अहवाल व त्या संबंधीची कागदपत्रे शिवप्रभा, देशमुख प्लॉट, उपळाई रोड, बार्शी या पत्त्यावर दि. १५ डिसेंबर पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कापसे ९४२३३३२२१५, सचिव प्रताप दराडे ९७६६५६६३८९ यांनी केले आहे.
 
Top