उस्मानाबाद -: राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे  सन २०१३-१४ या वर्षाकरीता  महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिला व संस्थांना अहिल्यादेवी पुरस्कार दिला जातो. इच्छुकांनी आपला पुरस्कारासाठीचा प्रस्ताव २४ डिसेंबरपुर्वी  पाठवावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैभव सुर्यवंशी यांनी केले आहे.
     राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम एक लाख एक रुपये रोख स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे  स्वरुप आहेत. पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान २५ वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या महिलांना तो पुरस्कार मिळाल्याचे ५ वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
      विभागीय स्तरावरील पुरस्काराचे स्वरुप २५ हजार एक रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.  संस्था पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान ७ वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था ही राजकारणापासून अलिप्त असावी. तिचे कार्य व सेवाही पक्षातील राजकारणापासून अलिप्त असावे.
      जिल्हा स्तरावरील पुरस्काराचे स्वरुप १० हजार एक रोख स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्कारासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमला, गाळा क्रमांक १५ ची डावी बाजू, उस्मानाबाद येथे सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन आपला प्रस्ताव वेळेत पाठवावेत असे कळविण्यात आले आहे.     
 
Top