उमरगा : आलूर (ता. उमरगा) येथे तरुणीची छेड काढण्‍यावरुन दोन गटात हाणामारी झाल्‍याची घटना दि. १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरूद्ध तक्रार मुरुम पोलिस ठाण्यात दिल्यावरून दोन्ही गटावर गुन्हा दाखल करून ८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुरुम पोलिसांनी दिली.
    सलमान घुडूसाब लोहारे याने एका तरूणीस माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून हात धरून बळजबरीने मोटार सायकलवर बसवण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद त्या तरुणीने मुरुम पोलिसात दिली. तसेच त्या मुलीस तुझ्या घरातील एकाही माणसाला जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली. आरोपी सलमान लोहारे, रहमतबी लोहारे, घुडूसाब लोहारे, कलीम लोहारे, रफीक लोहारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर घुडूसाब लोहारे यांनी भाजी विकून आलूर बसस्थानकावर आल्यानंतर त्यांचा मुलगा कलीम लोहारे या दोघांना सिद्धु आगोमशेट्टी, शंकर आगोमशेट्टी, बसु आगोमशेट्टी इतर चार जणांनी काठीने मारहाण करून जखमी केले व मोटार सायकलचीही तोडफोड केल्याची फिर्याद दिल्यावरून वरील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पवार हे करीत आहेत.
 
Top