बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शेतकरी आत्‍महत्या करत असल्याच्या घटना दिवसेंदिवस पुढे येत असतांना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील सावकारांचा संगणमताने सुरु असलेला गोरखधंदा एका तक्रारीवरुन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
    वैराग (ता.बार्शी) येथील विजय म्हेत्रे याने एका व्यक्तीकडून अवघे २ हजार रुपये वैयक्तिक अडचणीकरीता घेतले. सदरच्या रकमेवर आठवड्याला ४०० रुपये अशी मनमानी व्याजाची आकारणी करुन वसूली सुरु केली. वेळोवेळी रक्कम परत घेऊनही आणखी पैशाची मागणी करुन म्हेत्रे यास त्रास देण्यास सुरुवात केली. त्या त्रासाने म्हेत्रे यास त्रास होत नाही मग आपण मारु व धमकी देऊ अशा विचाराने शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान ७ जणांनी त्यास गावाच्या बाहेरील बाजूस बळजबरीने नेले. यावेळी त्यास काठी व सायकलच्या चेनने मारहाण करण्यात आली. सदरच्या प्रकारानंतर म्हेत्रे यांनी पोलिसांत खबर दिली आहे. म्हेत्रे यांनी वैराग पोलिसांत दिलेल्या तक्रारीत बबलू पवार, शशिकांत घोडे, उमर शेख, सागर पवार, घुलेश पवार, आप्पा उंबरे, नागेश कांबळे सर्व रा. वैराग अशी नावे देण्यात आली आहेत. सदरच्या घटनेचा पुढील तपास सहा.पो.नि.शिवाजी नाईक हे करीत आहेत.
    सावकारांविरोधात शासनाच्या वतीने कडक कायदे करण्यात येत असूनही राजरोसपणे मोठ्या प्रमाणात सावकारी केली जात आहे. अत्यंत गरीब समाजव्यवस्थेत या सावकारीचे जाळे घट्ट असून दिवसभर काबाडकष्ट करणार्‍यांना मिळालेल्या मजूरीची रक्कम सावकारांच्या हवाली करण्याशिवाय मार्ग नसल्याच्या अनेक घटना दिसून येत आहेत. पोलिस मात्र कोणाची कसलीही तक्रार येत नसल्याने त्या गोष्टीकडे कानाडोळा करत आहेत. गळ्यामध्ये सोन्याच्या मोठ्या चेन अडकवून हे सावकार मात्र चुकाकीवरुन गल्लीबोळांतून आपले सावज हुडकण्यात रात्रंदिवस गुंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
Top