तुळजापूर : गतिरोधक असल्याने ब्रेक लावल्यानंतर पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने गाडीवरून पडून ट्रकच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात पतीही गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवार दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सांगवी (ता. तुळजापूर) येथे चंद्रलोक हॉटेलजवळ घडला.
    सर्पमित्र असणारे नागा शिंदे (रा. सिद्धेश्वर मार्केट यार्ड मागे, सोलापूर) हे पत्नी शोभा शिंदे व नातू सूरज (6 महिने) यांना घेऊन सोलापूर येथून तुळजापूरकडे निघाले होते. त्यांची दुचाकी (क्र.एमएच 25।1891) सांगवी- काटी गावाजवळ पोहोचली असता नागा शिंदे यांना रस्त्यात असणारा गतिरोधक अचानक दिसल्याने त्यांनी ब्रेक लावला. याचवेळी पाठीमागून येणार्‍या मालट्रक (क्र.डीएल।1जी।सी 0357) ने जोराची धडक दिली. यामुळे नागा शिंदे डाव्या बाजूला पडले तर त्यांच्या पत्नी उजव्या बाजूला पडल्याने पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. सुदैवाने त्यांच्या कडेवरील सहा महिन्यांचा सूरज बाजूला फेकला गेल्याने तो बचावला. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी साहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साबळे यांनी कर्मचार्‍यांसह वाहने बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.
 
Top