बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जगाच्या बाजारात आता पुर्वीसारखे बाबजाद्याची पिढी म्हणून लोक स्विकार करणार नाहीत. जगातील ज्ञानाच्या दृष्टीने वंश परंपरेला कोणतेही महत्व राहिले नाही. जगामध्ये आज ज्ञान हेच भांडवल झाले आहे. त्यामुळे प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना अपडेट राहणे ही भावी काळाची गरज झाली आहे असे मत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
    शिवाजी महाविद्यालयातील झालेल्या तीन दिवसांच्या इमर्जिंग होराईझन्स इन बायो-केमिकल सायन्सेस अॅण्ड नॅनोमटेरियल्स या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे प्रा.सी.डी.लोखंडे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, डॉ. मधुकर फरताडे, डॉ. थारोत, आर.आर.कोठावळे, बापू शितोळे, देबडवार, मोरे, व्ही.एस.पाटील, व.न.इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलतांना सोपल म्हणाले, महाविद्यालयीन पातळीवरील अशा प्रकारचे उपक्रम होणे आणि ते चांगले यशस्वी होणे ही अपवादात्‍मक बाब आहे. ही परिषद यशस्वी केली यामुळे आजचे विद्यार्थी, प्राध्यापक यांना यापुढील काळ जगाबरोबर आपले ज्ञान अपडेट करण्याच्या संधी आहेत. शिबीर, कॉन्‍फरन्‍स, वर्कशॉप, मेळावा, प्रशिक्षण शिबीर आदी वेगवेगळ्या विविध शब्‍दांनी अथवा नावाने कार्यक्रमाचे आयोजन केले तरी त्‍यातील अभ्‍यास हा महत्‍त्‍वाचा उद्देश आहे. यावर विनोद करत ना. सोपल म्‍हणाले, अनेक जण अभ्‍यास दो-याच्‍या निमित्‍ताने परदेशात जातात, परंतु भलताच अभ्‍यास करतांना दिसून येते. या आंतरराष्‍ट्रीय परिषदेसाठी उपस्थित झालेले विद्यार्थी, शिक्षक, संशोधक यांनी विचारांची देवाण-घेवाण केली आहे. त्‍यामुळे नवीन अभ्‍यासकांना त्‍याचा उपयोग झाला. अभ्‍यासलेले, वाचलेले व त्‍याच्‍या चर्चेने ज्ञानात ख-या अर्थाने भर पडते आणि हाच मुख्‍य हेतू याच्‍या आयोजनाचा आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेली ही परिषद महाविद्यालयाच्‍या दृष्‍टीने मेगा इव्‍हेंट ठरली आहे. सहभागी झालेल्‍यांच्‍या विचार प्रकटनाने समाधाना दिसून आले. त्‍या काळात कोणाची कसलीही तक्रार नाही. ही महाविद्यालयाचे प्राचार्य फरताडे यांच्‍या दृष्‍टीने गौरवाची बाब आहे व त्‍यांचे यश आहे, असेही ते शेवटी म्‍हणाले.
      इंग्रजीतील भाषणांमुळे अनेक अवांतर भाषणे टाळली गेल्‍याचे समाधान व्‍यक्‍त करत प्रमुख पाहुणे सी.डी. लोखंडे हे प्राणीशास्‍त्रातील विशेष प्राविण्‍य मिळविलेले तर आयोजक प्राचार्य हे संगीत अलंकार या विषयावरील प्राविण्‍य मिळविलेले असे दोन वेगवेगळी टोके असतानाही अत्‍यंत चांगल्‍या रितीने परिषद यशस्‍वी केल्‍याबाबत कौतुक केले. यावेळी परिषदेतील उत्‍कृष्‍ट विद्यार्थ्‍यांना पारितोषिके देऊन गौरविण्‍यात आले.
 
Top