उमरगा (लक्ष्‍मण पवार) : श्री दत्‍त प्रभुच्‍या आगाध लीलेचे वर्णन करणा-या ''गुरु चरित्र'' या पवित्र ग्रंथाचे लेखन ज्‍या ठिकाणी झाले अशा कर्नाटक राज्‍यातील  कडगंची (ता. आळंद, जि. गुलबर्गा) येथील सायंदेव दत्‍त मंदिरात सोमवार दि. 16 डिसेंबरपासून श्री दत्‍त जयंती महोत्‍सव मोठ्या उत्‍साहाने संपन्‍न होत आहे.
    दत्‍त प्रभुचे दुसरे अवतार भगवान नृसिंह सरस्‍वती यांचे प्रिय शिष्‍य सांयदेव यांचे कडगंची हे जन्‍मठिकाण आहे. सायंदेव यांच्‍या पाचव्‍या पिढीतील वंशज असलेले सरस्‍वती गंगाधर यांनी कडगंची येथे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे लिखान केले आहे. या ठिकाणी प्रत्‍यक्ष भगवान नृसिंह सरस्‍वती यांनी 650 वर्षापूर्वी आपल्‍या निर्गुण करुणा पादुका सांयदेवास देवुन ''या पादुकाच्‍या रुपाने मी सदैव येथे राहणार आहे'' असे वचन दिले होते, त्‍या पादुका आजही या मंदिरात अस्तित्‍वात असून यांच्‍या दर्शनाने अनेक भक्‍तांना दत्‍त प्रभुंचा साक्षात्‍कार झाला आहे.
    प्रत्‍यक्ष दत्‍तप्रभुने सिध्‍द भुमीच्‍या रुपाने नामधारक सरस्‍वती गंगाधारास श्रीपाद श्रीवल्‍लभ व नृसिंह सरस्‍वती यांच्‍या संपूर्ण अवतार कार्याची गाथा गुरुशिष्‍य संवाद रुपाने ग्रंथित होऊन भविष्‍यातील मानव कल्‍याणासाठी गुरुचरित्र या ग्रंथाची निर्मिती करण्‍यात आली आहे.
    मंदिरातील दत्‍त प्रभुंच्‍या करुणामय मनमोहक मुर्तीचे भक्‍तांना दर्शन झाल्‍यास क्षणभर तो दत्‍तमय     होऊन जातो. सायंदेव दत्‍त मंदिरासमोरील सभागृहाच्‍या खाली असलेल्‍या गुहेत सरस्‍वती गंगाधार यांनी या ग्रंथाचे लिखान केले आहे. या गुहेत दर्शनासाठी गेले असता भक्‍तांना माती ऐवजी सुगंधित भस्‍माचा सुगंध दरवळल्‍याची जाणिव होते. या गुरुचरित्र ग्रंथामध्‍ये कडगंची या गावचा उल्‍लेख असल्‍याचे आढळते. गुलबर्गा-आळंद रस्‍त्‍यावर गाणगापूर पासुन अवघ्‍या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या कडगंची येथील सायंदेव दत्‍त मंदीर म्‍हणजे जसे पंढरपुरात विठ्ठलाच्‍या पायथ्‍यांशी नामदेव पायरी आहे, तसे दत्‍त प्रभुंच्‍या पायथ्‍यांशी कडगंची येथे सायंदेव पायरी आहे. या सायंदेवाचे दर्शन घेतल्‍यावरच संपूर्ण दत्‍त दर्शन घेतल्‍याचे पुण्‍य पदरात पडते. गाणगापुरात आलेल्‍या अनेक भक्‍तांना दत्‍तप्रभुंनी इकडे कशाला गर्दी करता, कडगंची येथे सायंदेव मंदीरात या, मी येथे दर्शन देतो, असे अनेक दत्‍त भक्‍तांनी आपल्‍या अनुभव कथनातुन हा प्रसंग व्‍यक्‍त केला आहे. अशा पवित्र ठिकाणी गुरुचरित्र पारायण किंवा 14 व्‍या या एका अध्‍यायाचे वाचन वा दर्शन घेतल्‍याने अनेकांची मनोकामना त्‍वरीत पुर्ण होते, अशी भाविकांची श्रध्‍दा आहे. जवळच 10 किलोमीटर अंतरावर नरोणा येथे कार्तिक स्‍वामींचे स्‍वयंभु मंदीर आहे, कार्तिक महिन्‍यातील कार्तिक नक्षत्र वगळता इतर वेळी फक्‍त पुरुषांनाच दर्शन घेता येते.
    कडगंची या पवित्र क्षेत्री वर्षभर भक्‍तांना निवास व प्रसादाची मोफत व्‍यवस्‍था केली असून दत्‍त भक्‍तांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन सायंदेव दत्‍त ट्रस्‍ट समितीचे अध्‍यक्ष थोर संत शिवशरणाप्‍पा व पदाधिका-यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भक्‍तांनी     मंदीर व्‍यवस्‍थापक विश्‍वनाथ (मो. 09901178593) यांच्‍याशी संपर्क साधावा.
 
Top