उस्‍मानाबाद : जन्‍मदात्‍या बापाचा किरकोळ कारणावरुन मुलाने धारदार शस्‍त्राने सपासप करुन निघृण करुन फरार झालेल्‍या मुलास तात्‍काळ पोलिसांनी अटक करुन गजाआड केले. ही घटना सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी तेर (ता. उस्‍मानाबाद) येथे रात्री घडली होती.
    नानासाहेब दादाराव टेळे (वय 60 वर्षे, रा. तेर, ता. उस्‍मानाबाद) असे खुन झालेल्‍या पित्‍याचे नाव आहे. तर नेताजी नानासाहेब टेळे (रा. तेर, ता. उस्‍मानाबाद) असे अटक करण्‍यात आलेल्‍या मुलाचे नाव आहे. यातील नानासाहेब टेळे रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास घरात झोपले होते. त्यांचा मुलगा नेताजी हा सकाळीच शिर्डी येथून तेर येथे आला होता. वडील नानासाहेब यांनी त्याला घराच्या बाहेर हो, असे म्हणत घराबाहेर हाकलले. या किरकोळ कारणामुळे नेताजी याने तीक्ष्ण हत्याराने पित्यावर सात वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. मुकुंद माने यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक माधव गुंडीले, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे, साहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. ढोकी पोलिसांनी मुरुड, ढोकी, परिसरात काही ट्रॅव्हल्सची तपासणी केली. मात्र, आरोपी सापडला नाही. याप्रकरणी मृताची सून सोनाली तानाजी टेळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 

रेल्वेस्थानकावरून आरोपीला अटक
विविध ठिकाणी शोध घेऊनही पोलिसांना आरोपी सापडत नव्हता. आरोपी हा सतत रेल्वेने प्रवास करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर पोलिसांनी सापळा रचला. परळी - मिरज रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी नेताजी टेळे याला अटक केली. सदरील रेल्वेगाडी अर्धातास उशिरा आल्याने त्याला अटक करणे शक्य झाले. ही कामगिरी साहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, बीट अंमलदार ए. पी. काळे, जाधव, तांबडे, शौकत पठाण आदींनी केली आहे.

 
Top