उस्मानाबाद :- नवीन वर्षात पाऊल ठेवतानाच सरत्या वर्षातील प्रलंबित कामाचा निपटारा करुन येथील कोषागार कार्यालयाने सरत्या वर्षाला शानदार निरोप दिला असून नववर्षाचे स्वागत नवीन कामांनी करण्याचा अनोखा व अभिनंदनीय प्रयत्न केला आहे. 
    उस्‍मानाबाद जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांची तसेच कोषागार कार्यालयातील देयके, अर्ज व मागण्या २०१३ या वर्षातच पारित करण्याचे आवाहन  कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी केले. त्यास येथील कार्यालयातील त्यांच्या सर्व सहका-यांसह तालुकापातळीवरील उपकोषागार कार्यालयातील कर्मचा-यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.  त्यामुळे नवीन वर्षात नवे संकल्प करताना 31 डिसेंबरलाच सर्व जुनी कामे पूर्ण करण्याचा निर्धार पूर्ण करुन वर्ष 2013 ला अतिशय चांगल्या प्रकारे निरोप त्यांनी दिला.
     कोषागार कार्यालयातील सर्व शाखांनी अतिरिक्त वेळेत काम करुन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे.३१ डिसेंबर रोजी दाखल झालेली सर्व प्रकारची देयके त्याचदिवशी पारित केली. त्यामुळे वेतन देयके सादर केलेल्या सर्वांना नववर्षाच्या पहिल्या दिवशीच वेतन तसेच सर्व निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतनही ३१ डिसेंबरलाच सर्व संबंधित बैंकांकडे पाठविण्यात आले. विविध विभागांची जमा रकमा तपासणीची विविध विवरणपत्रेही वर्षाच्या या शेवटच्या दिवशी तपासणी करुन निपटारा करण्यात आली. याचबरोबर शासन, वरिष्ठ विभागीय कार्यालय,  जिल्हाधिकारी यांनी मागविलेल्या विविध प्रकारची माहितीही पाठवून त्याबाबत शून्य प्रलंबितता ठेवली असल्याचे कोषागार अधिकारी श्री. कदम यांनी सांगितले.
       अंशदान निवृत्तीवेतन योजनेत नवीन भरती झालेल्या व ज्यांनी आवेदनपत्र सादर केले आहे अशा सर्व शासकीय कर्मचा-यांनाही त्यांचा सांकेतीक क्रमांक ३१ डिसेंबर रोजी देण्यात आला. कोषागार कार्यालयाने वरिष्ठांना सादर करावयाची विविध प्रकारची मासिक, त्रैमासिक, वार्षिक विवरणपत्रे वरिष्ठांना सादर करुन ‘नवीन वर्षात नवीन काम’ याप्रकारे काम आता सुरु होणार आहे. विविध कार्यालयाची स्वीय प्रपंजी लेख्यामधील धनादेशाद्वारे काढावयाच्या रकमाही दि. ३१ डिसेंबर रोजी मंजूर केल्या.  कोषागाराचा मासिक लेखा महालेखापालांना विहित वेळेत सादर करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आल्याचे  श्री.कदम यांनी सांगितले.
      कोषागार अधिकारी राहुल कदम आणि त्यांच्या सर्व सहका-यांचे या उपक्रमाबद्दल अनेक कार्यालयप्रमुखांनी स्वागत केले आणि त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्या.
 
Top