नळदुर्ग : ‘‘मैलारपूरा जाऊ खंडोबाचा भंडारा लावू, मनी यळकोट यळकोट गाऊ, मल्हारीचं दर्शन घेऊ’ या जयघोषानी मैलारपुर (नळदुर्ग) नगरी दुमदुमली आहे. बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी पहाटे मैलारपुरात मल्‍हारी मार्तंड खंडेरायाचे उत्‍साहात आगमन झाले आहे.
    अनेक घराण्याचे कुलदैवत असलेल्या प्राचीन खंडोबा दैवताच्‍या  यात्रेची परंपरा नळदुर्ग या ठिकाणी अकराव्या शतकापासुन चालु आहे. भक्तांच्या रक्षणासाठी मणिमल्ल या दैत्याचा वध करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवचा अवतार घेतला. खंडोबा म्हणजे मार्तंड भैरव. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मिळून खंडोबाची बारा स्थाने आहेत. त्यात जेजुरी हे महत्वाचे स्थान आहे. नळदुर्ग शहराच्या उत्तरेला असलेल्या या खंडोबा देवाच्या यात्रेचे एक वैशिष्ट्ये असे , की मुळ मुर्ती इतरत्र हलवून दुस-या ठिकाणी पावणे दोन महिने वास्तव्य करणे. यात्रा झाली की सव्वा दहा महिने पुन्हा अणदूरच्या खंडोबा मंदिरात वास्तव्य करते. असे उदाहरण एकमेव आहे.
    पावणे दोन महिने खंडोबाला आणण्यासाठी शहरातील भाविक वाजत गाजत, मशाली लावून मंगळवार रोजी रात्री अणदूरला रवाना झाले होते. बुधवार रोजी पहाटे श्री. खंडोबाचे नळदुर्गच्‍या उत्‍तरेकडे असलेल्‍या बोरी नदीच्‍या काठावरील मंदिरात आगमन झाले .अनेक भाविक पहाटेच्यावेळी खंडोबा अभिषेक करतात. मार्गशिर्ष प्रतिपदेला वारू जात्यात अंदो-याला, दुर्गामंधी खंडोबा येतो पहाटेच्या पुजेला या दिवशी खंडोबाला सजगु-याचा भाकरी, पातेची भाजी, वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखविला जातो. या पावणे दोन महिन्याच्या कालावधीत दररोज  भाविक एकसारखी रिघ लागलेली असते.
    रविवारी मात्र भक्‍ताची मोठयाप्रमाणावर  गर्दी होते.मैलारपुरासह नळदुर्ग  शहरात एक चैतन्याचे वातावरण निर्माण होते. गावातील अनेक लोक याकालावधीत वारू जेऊ घालतात. कोणी दंडवत घालतात तर कोणी देवाला बाशिंग चढवतात.  या कालावधीत स्थानिक व परिसरातील अनेक भक्त श्री खंडोबाला सकाळी ,रात्री अभिषेक करतात.
    पावणे दोन महिने सकाळ, संध्याकाळ अभिषेक, प्रत्येक रविवारी महाप्रसाद असा नित्यक्रम पहायला उत्‍साहात साजरा होतो. यात्रा झाल्यानंतर स्थानिक व्यापा-यांच्यावतीने खिचडी व भजे ही मेजवानी दिली जाते. पूर्वापार चालु असलेल्या या रुढी परंपरेचा आदर ठेवून नळदुर्गकर या खंडोबाची सेवा करतात. वरील या कालावधीत या परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, आरोग्यआदि सुविधा नळदुर्ग नगरपालिका पुरविते.
 
Top