बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्यावतीने संकेश्वर उद्यान परिसरात नव्याने बांधलेल्या छत्रपती संभाजी राजे शॉपींग सेंटरचे उद्घाटन १६ डिसेंबर रोजी युवराज संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्या हस्ते होत आहे. सदरच्या नावावरुन बार्शी नगरपरिषदेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
    बार्शी नगरपरिषदेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपींग सेंटरला छत्रपती संभाजी राजे यांचे नांव घेतांना आदरार्थी लिहावे, चौकाला छत्रपती संभाजी राजे चौक असे नामकरण करावे, प्रसिध्द होणार्‍या डिजीटलची तसेच निमंत्रण परित्रेत सुधारणा करावी, अशी लेखी मागणी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आण्णा शिंदे यांनी मुख्‍याधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीला सत्ताधारी पक्षाच्यावतीने तसेच मुख्याधिकारी यांनी सहमती दर्शवली आहे. याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल असेही सांगण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी तसेच या शॉपींग सेंटरच्या अगदी लगतच असलेल्या स्व.आण्णासाहेब बारबोले शॉपींग सेंटर आणि नव्याने बांधण्यात आलेल्या या कॉम्पेल्सची इमारत एकच असल्यासारखे वाटत असल्याची शंका अनेकांची उपस्थित केल्याने सदरच्या ठिकाणी काही वेळापुरते तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून सदरच्या कॉम्प्लेक्सचे काम केंव्हा पूर्ण झाले ते कोणत्या अनुदानातून झाले, हे कामकाज याची स्थापत्य रचना, याची दिशा, याचे बांधकाम केंव्हा सुरु झाले व केंव्हा संपले. हे नांव देण्याचा ठराव केंव्हा झाला तसेच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी याला सर्वानुमते मंजूरी दिली यावेळी देण्यात आलेले नाव हेच पत्रिकेत, प्रसिध्दीस दिलेल्या डिजीटलवर आले व तुमच्या मागणीनुसार तात्काळ दुरुस्त करत आहोत याची सविस्तर माहिती सांगून शंकेचे समाधान केले. तरीही काही कार्यकर्त्यांनी आपला हेका सोडला नाही व आजच्या आज नगरपालिकेने सर्वसाधारण सभा बोलावून ठराव घ्यावा आणि पुतळ्याला परवानगी द्यावी, आम्ही रात्रीतून पुतळा उभारु तसेच काही जण या ठिकाणी हे नावच नको म्हणू लागले. सदरच्या वेळी झालेल्या गदारोळाची माहिती मिळाल्याने बार्शी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्यासह एक पथक बार्शी नगरपरिषदेत आले व काहीजणांच्या चुकीच्या वक्तव्यावरुन हाताबाहेर चाललेली परिस्थिती आटोक्यात आणली.
 
Top