कळंब -: ज्येष्ठ नागरिकांना केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्या योजनांचा माहिती करुन घ्यावी. मी ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या अडी-अडीचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
       तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे आयोजित  ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ कलावंतांच्या मेळाव्यात उदघाटनपर भाषण पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी खासदार पद्मसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर,जि.प.अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, नगराध्यक्ष शिवाजी कापसे,उपनराध्यक्ष पाडूरंग कुंभार,धनंजय रणदिवे,सुरेश टेकाळे, विलास पाटील, बापू मिटकरी, ॲड.मनगिरे माणिकराव डिकले, विद्यावान पंडीत गुरुकुल,येडशीचे आचार्य सुभाषचंद्र, वक्ते डॉ.बी.आर.पाटील, डॉ. मुकूंद जोशी, धर्ममुनी, भागवत धस, लक्ष्मण सरडे, तहसीलदार श्री.शिंदे, प्राचार्य डॉ.अशोकराव मोहेकर आदि उपस्थित होते.
       यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नुकतीच सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेमार्फत दुर्जर आजारावर मदत केली जाते. ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या असतात त्या सोडविण्यासाठी शरीराला कष्टाची सवय लावून घेतली तरच आजार कमी होण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री श्री.चव्हाण पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने जाहीर केलेले धोरण फायदेशीर आहे.नगर पालिकांमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यातून विरंगुळा केंद्रासाठी प्रस्ताव आल्यास जिल्हा वार्षीक योजनेतून निधी देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांचा समाजाने सन्मानाने आदर करावा. ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवण्याविषयी पाठपुरावा करु, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले. 
       खा.डॉ.पाटील यावेळी म्हणाले की, आपली मुलं जर या वयात व्यवस्थित वागत नसतील तर ज्येष्ठांनी निराश  न होता आपले जीवन शांतपणे व्यतित करावे. केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. ज्येष्ठांनी व निराधारांनी  शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
        आपण मुलांवर केलेले संस्कार योग्य असतील तरीही आजच्या मुलांना प्रशिक्षणाची गरज आहे. जेष्ठांचे  प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी दिले.
      यावेळी  वक्ते डॉ.बी.आर.पाटील, आचार्य सुभाषचंद्र  यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.  तसेच मान्यवरांच्या हस्ते  ज्येष्ठ कलावंतांना प्राथनिधिक स्वरुपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिटकरी यांनी केले. सूत्रसंचालन डी.के.कुलकर्णी तर आभार महादेव महाराज आडसूळ यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
 
Top