पांगरी (गणेश गोडसे) :- शासनाकडुन नौकरी मिळत नसल्यामुळे त्यांच्या हाताकडे अथवा निर्णयाकडे लक्ष न ठेवता बेरोजगारीवर मात करण्‍यासाठी पुढाकार घेऊन बार्शी तालुक्‍यातील कुसळंब गावासह परिसरातील गावांमधील अनेक तरूण व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बोर उद्योगातुन आपला बेकारीचा प्रश्‍न सोडवत अर्थाजन करण्‍यास सुरूवात केली असुन बोरांची बाजारपेठ शोधुन शेतीतुन पैसै मिळवुन आदर्श शेतीचे उदाहरण येथील कांही युवा तरूण ठरू पहात आहेत.
   या भागात घरटी किमान बागाचे क्षेत्र असल्यामुळे पुणे-लातुर राज्य मार्ग तसेच कुसळंब येथील टोल नाका परिसर यासह आपल्या आपल्या शेताच्या रोडलगत ताज्या बोरांचे स्टॉल्स उभारून त्यातुन भरपुर पैसै येथील युवा वर्गाला मिळु लागले आहेत. राज्य मार्गावर बोर विक्रीतुन प्रतीदिन हजार ते दिड हजार रूपये येथील सुक्षितीत तरूणांच्या हातात पडु लागले आहेत. त्यामुळे येथील काही तरूण सरकारी नौकरी नको रे बाबा असे म्हणुन शेती उद्योगातच रमुन गेल्याचे निदर्शनास येत आहे. नौकरीच्याच मागे न लागता शेतीव्यवसायाला चालना देऊन त्यात आपले भविष्य शोधण्‍याचा प्रयत्न तरूण वर्गाकडुन होत असल्यामुळे हा शेती उद्योगासाठी एक सुखद अनुभव ठरू पहात आहे.
   स्वतःच्याच शेतात उत्पादित होणा-या बोरांचे छोटया आकाराचे पॅकींग करुन कुसळंब येथील टोलनाक्यावर येथील तरूणांकडुन दररोज विक्री केली जात आहे. दैनंदीन होणा-या विक्रीतुन एका तरूणाला प्रतीदिन 2 हजार रूपयांपर्यंत विक्रीतुन मिळत असल्याचे येथील विक्री करणा-या तरूणांनी सांगितले. या टोलनाक्यावर 50 ते 60 तरूण येणा-या जाणा-या वाहन व ग्राहकांना बोरांची विक्री करूण त्यातुन पैसै मिळवतात.
तीन महिन्यात वर्षभराची पुंजी 
    बोरांच्या विक्रीचा हंगाम हा सरासरी तिन ते चार महिन्यांच्या आसपास चालतो. या कालावधीत बोर उत्पादक शेतकरी या मधुन लाखो रूपयांची कमाई करतो व बोरांचा भार संपल्यानंतर कांही कालावधी गेल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने व जोमात बोरांच्या बागांची मशागती करण्‍याच्या कामात गर्क होतो. बोरांच्या हंगामाच्या कालावधीत मात्र ऊत्पादकाला थोडीही उसंत मिळु शकत नाही. कुसळंब गावाचा आदर्श आता इतर अनेक गांवामधील शेतकरी घेऊ लागलेले आहेत. येथील उत्पादकांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यात आधुनिक विविध बोरांच्या जातींची लागवड वाढत आहे.
प्रकिया उदयोगाची गरज
    कुसळंब परिसरासह बार्शी तालुक्यात वाढत असलेल्या बोर लागवडीच्या क्षेत्राचा विचार करता तालुक्यात योग्य ठिकाणी बोरावर प्रक्रिया करून त्यापासुन उपपदार्थ निर्मिर्ती केंद्राची स्थापना होणे गरजेचे आहे़. परिसरात बोरांपासुन चिप्स, बोर रस आदी उपपदार्थांसह इतर छोटे पदार्थांची मोठया प्रमाणात निर्मिती होऊ शकते. सध्या बोरांचा उद्योगांत होत असलेला उपयोग हा अल्प प्रमाणात असल्यामुळे कधी कधी बोरांचे दर गडगडतात. त्यामुळे उद्योगपतींनी याकडे लक्ष केंद्रीत करूण या भागात उपपदार्थ निर्मिती कारखाने स्थापन करावेत, जेणेकरुन उत्पादकांना कायम हमी भाव उपलब्ध होईल, अशी बार्शी तालुक्यातील बोर उत्पादक शेतक-यांची मागणी आहे.
 
Top