पांगरी (गणेश गोडसे) :- पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण देऊन पोलिसात भरती करण्‍यासाठी पैसै घेऊन फसवणुक केल्याची घटना उक्कडगांव व औरंगाबाद येथे घडली असुन याप्रकरणी आरोपीविरूदध गुन्हा दाखल करण्‍याचे आदेश बार्शी न्यायालयाने दिले आहेत.
     आपली ५५ हजार रूपयांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय अनंता सांगळे (वय ४९, रा. उक्कडगांव, ता. बार्शी) यांनी यासंदर्भात बार्शी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.
     दतात्रय सांगळे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की औरंगाबाद येथील भगवान किसनराव नांगरे यांनी पोलिस सैनिकी भरतीपुर्व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातुन त्यांचा मुलगा अरूण याला दोन महिन्याचे भरतीपुर्व प्रशिक्षण दिले व नंतर तुमच्या मुलाला मि पोलिसात भरती करतो, असे सांगुन त्यांच्याकडुन ५५ हजार रूपये रक्कम घेतली. पैसै घेऊनही काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी भगवान नांगरे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता नांगरे यांनी खात्यात शिल्लक नसतानाही सांगळे यांना चेक दिला. खात्यात पैसै नसल्यामुळे चेक पास न झाल्यामुळे व पैसै मिळत नसल्यामुळे न्यायालयात धाव घेतली. पांगरी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये आज मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनु राठोड हे करत आहेत.
 
Top