जम्मू : जम्मू-काश्मीरमधील जनता दररोज दहशतीच्या छायेत वावरत असून या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज केला. काश्मीर खो-यातील फुटीरतावादी शक्तींना केंद्राकडून बळ दिले जात असल्याची जहरी टीका त्यानी केली.
    जम्मूतील मौलाना आझाद स्टेडियमवर आज रविवार दि. 1 डिसेंबर रोजी रोजी मोदी यांची ‘ललकार’ रॅली झाली. यावेळी बोलताना त्यांनी सुरूवातीलाच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे सामान्यांचं एवढ्या वर्षात काय भलं झालं आहे, असा सवाल केला. ‘कलम ३७० ज्या उद्देशाने लागू करण्यात आले होते, तो उद्देश साध्य झाला आहे का? सध्या तर कवच असल्याप्रमाणे त्याचा वापर केला जात आहे. त्याला थेट जातीयवादाशी जोडण्यात आले आहे. त्यात सरकार तर धर्मनिरपेक्षतेचे सोंग करून नेहमीच आपली जबाबदारी झटकत आहे. मग, खरंच या कलमाची आता तेथे गरज उरली आहे का?’, असा सवालही मोदींनी केला. गेल्या ६० वर्षांचा इतिहास पाहिल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या बाबतीत पंडित नेहरूंचे नाही तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचारच योग्य होते, याचा प्रत्यय येतो असे सांगत मोदी यांनी काश्मीरमधील सध्याच्या अस्थिर, दहशतीच्या वातावरणासाठी नेहरूंनाच दोष दिला.
    दहशतवादाच्या मुद्द्यावर केंद्रातील सरकार झोपी गेलेले आहे, असा आरोप करताना ‘पाकिस्तानच्या जेलमध्ये ज्या पद्धतीने सरबजीत सिंह आणि चमेल सिंह यांना मारण्यात आले, ते संतापाचा कडेलोट करणारे आहे. सरबजीत वाचू शकला असता पण, सरकारला तसे करता आले नाही. चमेल सिंहला मारल्यानंतर भारत सरकारने तत्काळ प्रत्युत्तर द्यायला हवं होतं पण, सरकारने काहीच केलं नाही. सरकार झोपून राहिले’, असा टोलाही मोदी यांनी लगावला.
 
Top