येणेगूर -: क्रिकेट खेळत असताना कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर आल्याने त्यातील ऊस काढण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीच्या चाकाखाली अडकून दोन बालकांचा मृत्यू झाल्‍याची घटना सोमवार रोजी सायंकाळी उमरगा तालुक्‍यातील आलूर-मुरुम रस्त्यावर  घडली.
    अक्षय शिवाजी पवार (वय १२) व धनू संजय ज्योती (वय ११) असे ट्रॉलीच्‍या चाकाखाली अकडून मृत्‍यू झालेल्‍या बालकांचे नावे आहेत. उमरगा तालुक्यातील आलूर ते मुरुम रस्त्यावरील ज्योती तांडानजिक मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होती. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या रस्त्यावरुन मुरुम येथील कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर (एम. एच. २५/पी. १३४६) ऊस घेऊन जात होता. ट्रॅक्टरमधील ऊस काढून घेण्यासाठी काही मुले ट्रॅक्टरकडे धावली. दोन ट्रॉली (एम. एच. ४२/एफ ४६६२, ६३) असलेल्या ट्रॅक्टरमधील पुढच्या ट्रॉलीमधून ऊस काढत असताना अक्षय पवार व धनू ज्योती हे दोघे पाय घसरुन खाली पडल्याने मागच्या ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुरुम ठाण्याचे सपोनि आनंदराव निंगदळे व ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरु होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालक लक्ष्मण पंचप्पा बंदीछोडे (रा.बेळंब) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत मुरुम पोलिस ठाण्यात सुरु होती.
 
Top