पांगरी (गणेश गोडसे) :- सलग तीन वर्षे दुष्काळामुळे रखडलेले शुभविवाह यावर्षी ब-यापैकी उरकले जावु लागले असुन सगळीकडेच शुभमंगल कार्याची धामधुम सुरू झाली असुन तिन वर्षांपासुन रेशीमगाठीची इच्छा बाळगुन असलेल्या तरूण-तरूणीमधुन आनंदाचे वातावरण असुन अनेकांना आता आपला नंबर लागणार याची खात्री झाल्यामुळे व लगीनघाईची चर्चा रंगु लागल्यामुळे मनातल्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या आहेत. विवाहबंधनाची धामधुम सुरू झाल्यामुळे बाजारपेठ मात्र फुलुन गेल्याचे व चलनवलनात मोठी भरीव वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
   गत तीन वर्षामध्ये वरूणराजाने अवकृपा दाखवल्यामुळे शेतक-यांसह सर्वसामान्य नागरीक पुरते हवालदिल झाले होते. त्यामुळे अनेक घरोघरची आर्थिक परिस्थिती नाजुक होऊन घरात तारूण्यात पदार्पण केलेल्या तरूणी घरातच राहिलेल्या होत्या. काही प्रसंगी तर तरूण-तरूणींचा साखरपुडयाचा कार्यक्रम उरकुन तीन-तीन वर्ष विवाह लांबवण्‍यात आलेल्याची उदाहरणे आहेत. तसेच कांही वेळा तर साखरपुडा होऊनही ठरल्याप्रमाणे विवाहाची तयारी करता न आल्यामुळे विवाह मोडण्‍याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावर्षी उशिरा का होरईना सगळीकडेच निसर्गाने थोडीशी का असेना साथ दिल्यामुळे व पावसाळी पिकांनी शेतक-यांचा खिसा चांगल्यापैकी गरम केल्यामुळे शेतक-यांनी रखडलेली विवाह समारंभाची कामे उरकुन डोक्यावरचा तान कमी करून मोकळे होण्‍याचा सपाटा लावला असल्याचे दिसत आहे. घरात उपवर झालेली मुलगी म्हणजे माता पित्यांना एक नकळत डोक्याला घोरच असतो. त्यामुळे नाजुक असलेल्या या जबाबदारीतुन मुक्त होण्‍यासाठी प्रत्येक पित्याची धडपड सुरू असते.

साखरपुडयात लग्न उरकन्याकडे कल
    अलीकडील काळात रखडलेले विवाहाचे कार्यक्रम एका झटक्यात उरकण्‍याकडे दोन्ही बाजुंच्या नातेवाईकांचा कल वाढत आहे. वाढती महागाई, सासरच्या मंडळींच्या वधुपक्षांकडुन वाढत्या अपेक्षा आदी बाबींचा विचार करून व दोन्ही बाजूंचा आर्थिक भुर्दंड टाळण्‍यासाठी धुमधडाक्यात लग्न करण्याची परंपरा मागे पडु लागली असुन साखरपुडयाच्या कार्यक्रमातच शुभमंगल सावधान म्‍हणण्‍याचे प्रमाण खुप वाढले आहे.

 वधुपक्षाचा भाव वधारला
    समाजात मुलींचा जन्‍मदर खालावत असल्याचा परिणाम सध्या मोठया प्रमाणात जाणवत असुन मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त असल्यामुळे मोठी तफावत जाणवत आहे. मुलाला मुलगी हुडकताना वर पित्याला खुप कसरत घ्यावी लागत आहे. तसेच मुलींची कमतरता भासत असल्यामुळे मुलांकडच्या मंडळींकडुन मानपानाचा जास्त अटहास होताना दिसत नाही.
 
ऊस आंदोलन मिटल्यामुळे समाधान
    नुकतेच राज्यभर सुरू असलेले ऊस दरवाढ आंदोलन तात्पुरते का असेना मागे घेण्‍यात आल्यामुळे ऊस ऊत्पादक शेतक-यांमधुन समाधान व्यक्त होत आहे. शेतात उभा असलेला उस कारखाने तोडुन घेऊन जावु लागल्यामुळे त्यांच्या चेह-यावर दुहेरी छटा पहावयास मिळत आहेत. दरवाढ न मिळाल्यामुळे आसु व ऊस जावुन पैसै हातात पडणार असल्यामुळे व त्या पैशातुन घरात रखडलेली कार्य पुर्णत्वास जाणार असल्यामुळे हासु असा दुहेरी संगम शेतक-यांच्याबाबतीत झाला आहे.

 
Top