बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शासनाच्या जवाहर योजनेत पाझर तलावापासून केवळ आठ मीटर अंतरावर बेकायदा विहीरीस शासकीय अनुदानाची खिरापत देण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे.
    कासारी मिर्झनपूर (ता. बार्शी) येथील एकाने सदरील विहीरीचे बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांनीच संगनमत केल्याची तक्रार सिताराम लिंबाजी लाटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. सदरच्या बेकायदा विहीरीचे कामकाज सुरु असतांना स्‍फोटकांचा वापर होत असल्याने त्याच वेळी तक्रार दिली असतांनाही बेकायदा विहीरीचे कामकाज थांबविण्याऐवजी लवकर काम पूर्ण करा असे लेखी पत्रच संबंधित सामील असलेल्या अधिकार्‍यांनी दिले. सदरच्या विहीरीसाठी ४३ हजार ६८७ रुपये अनुदानाचा पहिला हप्ताही देण्यात आला असून तो खोट्या कागदपत्रांच्या आधारे व शासनाची फसवणूक करुन दिल्याने सदरची विहीर बुजवण्यात यावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी लाटे यांनी केली आहे. सदरच्या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
Top